मुंबई : मुंबई क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा सर्वांना अनुभवता यावा यासाठी वानखेडे स्टेडियम परिसरात लवकरच एका संग्रहालयाची स्थापना होणार आहे. मंगळवारी झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बैठकीत हा निर्णय झाला.
एमसीए सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संग्रहालयासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे प्रमुख एमसीए अध्यक्ष डॉ. विजय पाटील असतील. तसेच या समितीमध्ये प्रा. रत्नाकर शेट्टी, रवी सावंत, सी. एस. नाईक आणि भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी, या संग्रहालय समितीच्या निर्णयावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने अध्यक्ष पाटील यांनी बैठक अर्धवट सोडली, अशी माहितीही मिळाली. त्याचवेळी, एमसीए समिती सदस्य अजिंक्य नाईक यांनी २०११ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने ठोकलेला विजयी षटकार ज्या सीटवर पडलेला, त्या सीटला धोनीचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव आता संग्रहालय समितीपुढे ठेवण्यात येणार असून लवकरच यावर निर्णय होईल.