Join us  

एक-दीड महिन्यांत संग्रहालयाची रूपरेषा ठरेल; मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांची 'लोकमत'ला माहिती

बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड असा विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 5:14 PM

Open in App

रोहित नाईक

मुंबई : ‘क्रिकेट संग्रहालयासाठी गेल्या अनेक वर्षापासून ‘एमसीए’च्या वतीने प्रयत्न सुरू आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आम्ही याबाबत एक समिती नेमणार असून येत्या एक-दीड महिन्यांमध्ये आम्ही संग्रहालयाची रूपरेषा जाहीर करु,’ असे मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड असा विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना रंगेल. या निमित्ताने काळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘विश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेट संग्रहालय उभारणीसाठी एक समिती नेमण्यात येईल. त्यानुसार पुढील एक-दीड महिन्यांत संग्रहालय कुठे उभारणार, कसे उभारणार, त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असेल, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी जाहीर होतील. या संग्रहालयात ठेवण्यात येणाऱ्या गोष्टीही जाहीर करण्यात येतील.’

यंदाच्या विश्वचषकातील भारत-श्रीलंका सामन्यासह इंग्लंड-दक्षिण आफ्रिका, दक्षिण आफ्रिका-बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान हे सामनेही वानखेडेवर रंगले. सर्व सामन्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या चारही सामन्यांना मिळून सुमारे ८५ हजार चाहते स्टेडियममध्ये उपस्थित राहिले, तर बुधवारी उपांत्य सामन्यात हा आकडा एक लाखाचा टप्पा पार करेल हे नक्की. याविषयी काळे म्हणाले, ‘मुंबई आणि क्रिकेट हे वेगळंच समीकरण आहे. क्रिकेट मुंबईकरांच्या रक्तात भिनले आहे. वानखेडे स्टेडियम व्यवस्थापन आणि एमसीए यांनी एकत्रितपणे हे यश मिळवले. प्रेक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमसीएच्या वतीने मोफत पॉपकाॅर्न आणि कोल्डड्रिंक देण्याची कल्पना सुचली. यामध्ये विशेष कौतुक प्रेक्षकांचे करावे लागेल. कारण, त्यांनी कुठेही गोंधळ किंवा धक्काबुक्की असे प्रकार केले नाही. यापुढेही जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय सामना होईल, तेव्हा परिस्थिती पाहून असा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू.’

...म्हणून धारावीच्या मुलांना आणलेधारावी परिसरातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना स्टेडियममधील प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उद्देशाने त्यांना विश्वचषक स्पर्धेतील काही सामन्यांसाठी निमंत्रित केले होते. या मुलांना उच्च दर्जाचे क्रिकेट पाहण्याची संधी सहजासहजी मिळत नाही. क्रिकेटच्या माध्यमातून कारकीर्द घडविण्याची त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला,’ असेही काळे यांनी सांगितले.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडमुंबई