Join us  

मुंबईचे फलंदाज पुन्हा ढेपाळले; कर्नाटकचा भेदक मारा

यजमानांचा डाव १९४ धावांत संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 3:04 AM

Open in App

मुंबई : पुन्हा एकदा फलंदाजांनी केलेल्या विश्वासघातकी खेळाचा फटका बसल्याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध मुंबई संघाचा डाव कोसळला. सकाळच्या थंड हवामानाचा फायदा घेत, भेदक मारा केलेल्या कर्नाटकने यजमानांना ५५.५ षटकांत केवळ १९४ धावांत गुंडाळले. यानंतर, कर्नाटकने दिवसअखेर २४ षटकांत ३ बाद ७९ धावा केल्या.वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीए स्टेडियमवर नाणेफेक जिंकून कर्नाटकने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. व्ही. कौशिक (३/४५), प्रतीक जैन (२/२०), रोहित मोरे (२/४७) व अभिमन्यू मिथुन (२/४८) यांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला. मुंबईकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने ९४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ७७ धावांची खेळी करताना अष्टपैलू शशांक आतर्डेसह सातव्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी केली. शशांकने ५१ चेंडूंत ६ चौकारांसह ३५ धावा केल्या.त्याआधी पृथ्वी शॉने ६ चौकारांसह २९ धावा फटकावल्या. मात्र, मिथुनने त्याला त्रिफळाचीत केले. तो बाद होण्याआधी सलामीवीर आदित्य तरे (०), अनुभवी अजिंक्य रहाणे (७) व सिद्धेश लाड (४) स्वस्तात बाद झाले. या दरम्यान सूर्यकुमारने एक बाजू लावून धरली खरी. मात्र, दुसऱ्या टोकाने सर्फराझ खान (८) व शाम्स मुलानी (०) झटपट परतल्याने मुंबईची ६ बाद ६० धावा अशी अवस्था झाली. यानंतर सूर्यकुमार-शशांक यांनी मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला.मुंबईच्या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकने बिनबाद ६८ अशी सुरुवात केली, परंतु मुलानीने २०व्या षटकात देवदत्त पडिक्कल (३२) व अभिषेक रेड्डी (०) यांना बाद करून मुंबईला पुनरागमन करून दिले. शशांकने रोहन कदमला (४) तंबूचा रस्ता दाखविल्याने कर्नाटकची ३ बाद ७७ धावा अशी अवस्था झाली. दिवसअखेर सलामीवीर रविकुमार समर्थ (४०*) नाबाद राहिला. कर्णधार करुण नायर त्याला साथ देत असून, अद्याप त्याने खाते उघडलेले नाही.पृथ्वी शॉ पुन्हा दुखापतग्रस्तपृथ्वी शॉ पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने यजमानांच्या चिंतेत भर पडली. लवकर तंदुरुस्त न झाल्यास त्याला आगामी न्यूझीलंड दौºयासही मुकावे लागेल. क्षेत्ररक्षण करताना ओव्हर थ्रो वाचविण्याच्या प्रयत्नात पृथ्वीच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला थेट मैदानाबाहेर नेण्यात आले. पुढील ८ दिवसांत पृथ्वी तंदुरुस्त झाला नाही, तर त्याला न्यूझीलंड दौºयास मुकावे लागेल.

टॅग्स :रणजी करंडक