Join us  

Ranji Trophy : पृथ्वी शॉची दमदार फटकेबाजी; अजिंक्य राहणेचीही आतषबाजी

पृथ्वीनं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत पाच सामन्यांत तीन अर्धशतकं झळकावली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 3:37 PM

Open in App

मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करून क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या पृथ्वी शॉनंरणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातही दमदार फटकेबाजी केली. पृथ्वीनं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत पाच सामन्यांत तीन अर्धशतकं झळकावली होती. त्यानं आज रणजी करंडक स्पर्धेत बडोदा संघाविरुद्ध आपला फॉर्म कायम राखताना धावांची भूक वाढत असल्याचे दाखवून दिलं. यावेळी त्याला अजिंक्य रहाणेचीही साथ मिळाली. अजिंक्यनंही चांगलीच फटकेबाजी करताना मुंबईच्या डावाला आकार दिला. 

रणजी करंडक स्पर्धेच्या 2019-20च्या मोसमाला आजपासून सुरुवात झाली. ट्वेंटी-20 फॉरमॅटनंतर पाच दिवसीय सामन्यात कमबॅक करणाऱ्या पृथ्वीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जय बिस्तासह सलामीला आलेल्या पृथ्वीनं पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. जय 18 धावांवर माघारी परतल्यानंतर शुभम रांजणेला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. पण, त्याला पृथ्वीसह फार मोठी भागीदारी करता आली नाही. पृथ्वी अर्धशतकी खेळी करून माघारी परतला. पृथ्वीनं 62 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 66 धावांची खेळी केली. त्यानंतर रांजणेही 59 चेंडूंत  5 चौकार व 1 षटकार खेचून 36 धावांत माघारी परतला. कर्णधार सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडता आला नाही.

मुंबईचे फलंदाज झटपट माघारी जात असताना अनुभवी अजिंक्यनं संघाचा डाव सावरला. त्यानं तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन मुंबईला दोनशेपार धावा करता आल्या. अजिंक्यनं 145 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीनं 79 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईनं 64 षटकांत 6 बाद 246 धावांपर्यंत मजल मारली होती. बडोद्याच्या भार्गव भटने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अभिमन्यूसिंग रजपूतनं दोन, तर कृणाल पांड्यानं एक विकेट घेतली. 

टॅग्स :रणजी करंडकअजिंक्य रहाणेपृथ्वी शॉ