मुंबई विक्रमी ४२व्यांदा रणजी ‘चॅम्पियन’;  अंतिम सामन्यात विदर्भाला १६९ धावांनी नमवले

वाडकरचे झुंजार शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 08:10 AM2024-03-15T08:10:34+5:302024-03-15T08:10:45+5:30

whatsapp join usJoin us
mumbai a record 42nd ranji trophy champion defeated vidarbha by 169 runs in the final match | मुंबई विक्रमी ४२व्यांदा रणजी ‘चॅम्पियन’;  अंतिम सामन्यात विदर्भाला १६९ धावांनी नमवले

मुंबई विक्रमी ४२व्यांदा रणजी ‘चॅम्पियन’;  अंतिम सामन्यात विदर्भाला १६९ धावांनी नमवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अखेर ज्या बळीची मुंबईकरांनी आतुरतेने प्रतीक्षा केली, तो बळी उपाहारानंतर २१ व्या मिनिटाला मिळाला आणि त्यानंतर पुढील अर्ध्या तासामध्ये विदर्भाचा डाव ३६८ धावांमध्ये गुंडाळत मुंबईने विक्रमी ४२व्यांदा रणजी जेतेपद पटकावले. विदर्भाने अखेरपर्यंत हार न मानता कडवी झुंज देत मुंबईकरांना जेतेपद उंचावण्यासाठी पाचव्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. 

मुंबईचा पहिला डाव २२४ धावांत संपुष्टात आल्यानंतर विदर्भाला केवळ १०५ धावा करता आल्या. पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी घेतलेल्या मुंबईने दुसऱ्या डावात ४१८ धावा उभारत विदर्भाला ५३८ धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाने चौथ्या दिवसापर्यंत ५ बाद २४८ धावांची मजल मारली होती. विदर्भासाठी विजय अशक्यप्राय दिसत असला, तरी कर्णधार अक्षय वाडकर आणि यश दुबे यांनी सहाव्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत मुंबईकरांच्या संयमाची परीक्षा घेतली.

विदर्भाने अखेरच्या दिवशी संपूर्ण पहिले सत्र शानदार फलंदाजी करत उपाहारापर्यंत मुंबईकरांना यश मिळू दिले नाही. दोघांनी सहाव्या गड्यासाठी २५५ चेंडूंत १३० धावांची शानदार भागीदारी केली. अक्षयने १९९ चेंडूंत ९ चौकार व एका षट्कारासह १०२ धावांची खेळी केली. हर्षने अप्रतिम झुंज देताना १२८ चेंडूंत ५ चौकार व २ षट्कारांसह ६५ धावा केल्या. उपाहारानंतर खेळ सुरू झाल्याच्या २१व्या मिनिटाला तनुष कोटियनने अक्षयला पायचीत पकडून मुंबईची प्रतीक्षा संपवली. यानंतर १५ धावांमध्ये उर्वरित चार बळी घेत मुंबईने विदर्भाचा डाव ३५३ धावांवरून ३६८ धावांवर संपुष्टात आणला. तनुषने ४ बळी घेत मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. तुषार देशपांडे आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने विदर्भाचा अखेरचा फलंदाज उमेश यादवला बाद करत आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीचा शानदार शेवट केला. 

मुंबईकरांचे वर्चस्व

अंतिम सामन्यातील दुसऱ्या डावात १३६ धावांची खेळी करत मुंबईला भक्कम स्थितीत आणणाऱ्या मुशीर खानने गोलंदाजीतही दुसऱ्या डावात २ बळी घेतले. या अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्याने ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावला. तसेच, संपूर्ण स्पर्धेत ५०२ धावा आणि २९ बळी अशी जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केलेल्या तनुष कोटियनने मालिकावीर पुरस्कारावर नाव कोरले. 

१० कोटी रुपयांचे बक्षीस

४२वे रणजी जेतेपद पटकावलेल्या मुंबईने बीसीसीआयकडून ५ कोटी रुपयांचे बक्षीसही पटकावले. त्याचवेळी, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी मुंबईच्या संघाला ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यासह मुंबई संघाने एकूण १० कोटी रुपयांची कमाई केली. रणजी उपविजेत्या विदर्भ संघाला ३ कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले.

आठ वर्षांनी पुन्हा जेतेपद

रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात कायम दबदबा राखणाऱ्या मुंबईने तब्बल आठ वर्षांनी ४२व्या जेतेपदाच्या रूपाने पुन्हा एकदा रणजी चषक उंचावला. याआधी २०१६ मध्ये मुंबईने आदित्य तरेच्या नेतृत्वात पुणे येथे सौराष्ट्रला एक डाव आणि २१ धावांनी नमवले होते. त्यावेळी शतक झळकावलेला श्रेयस अय्यर सामनावीर ठरला होता. यानंतर मुंबईला २०१६-१७ आणि २०२१-२२ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

नशिबानेही घेतली परीक्षा

पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एकही बळी न मिळाल्याने मुंबईकर काहीसे त्रस्त झाल्याचे दिसले. यावेळी युवा अष्टपैलू मुशीर खानने नशीब अजमावण्याचाही प्रयत्न केला. ११४ षटके झाल्यानंतर मुशीरने गोलंदाजाच्या बाजूकडील यष्ट्यांवरील बेल्सची अदलाबदल केली. यावेळी फिरकीपटू शम्स मुलानी गोलंदाजीस सज्ज झाला होता. परंतु, बळी मिळणे दूर, पण हर्ष दुबेने या षटकातील पाचव्या चेंडूवर एक चौकार मारला. त्यामुळे नशिबानेही मुंबईकरांची परीक्षा घेतल्याचे दिसले.

अय्यर मैदानात थिरकला

मुंबईने रणजी जेतेपद पटकावल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाआधी मुंबईचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर थिरकला. मुंबईच्या विक्रमी जेतेपदासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिलेल्या ढोल-ताशा पथकाने शानदार वादन केले. यावेळी अय्यरला त्या तालावर नाचण्याचा मोह आवरला नाही. त्याने ठेका धरतानाच स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनीही जल्लोष केला. सोशल मीडियावरही अय्यरचा हा ‘स्पेशल डान्स’ खूप व्हायरल झाला.

दर्दी प्रेक्षकांना अभिवादन

रणजी जेतेपद पटकावल्यानंतर मुंबई संघाने पाचही दिवस स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शविलेल्या दर्दी क्रिकेट प्रेक्षकांना अभिवादन केले. यावेळी मुंबईच्या खेळाडूंनी अखेरचा सामना खेळलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला खांद्यावर उचलले. धवलने रणजी चषक उंचावून मुंबईकर प्रेक्षकांचे संघाच्या वतीने आभार मानले. यावेळी चाहत्यांनीही धवलच्या नावाचा जयघोष केला.

रोहित म्हणतो, हा मुंबईचा खरा योद्धा

धवल कुलकर्णीने रणजी विजयासोबतच आपल्या १६ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला निरोप दिला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, अंतिम फेरीत शेवटचा बळी घेत कुलकर्णीने विदर्भाचा डाव गुंडाळला. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून धवलचा विशेष गौरव करण्यात आला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत क्रिकेटमधून निवृत्त होत असताना धवल भावनिक झालेला पाहायला मिळाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या खास मित्रासाठी ‘मुंबईचा योद्धा’ अशी पोस्ट लिहिली. देवनागरी लिपीत लिहिलेली रोहितची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. २००८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धवल कुलकर्णीच्या नावावर ९५ सामन्यांमध्ये २८१ बळी आहेत. शिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३० सामन्यांत २२३ बळी आहेत. धवलने २०१४ ते २०१६ या कालावधीत भारतासाठी १२ वन डे व २ टी-२० सामने खेळले.

धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ६४.३ षटकांत सर्वबाद २२४ धावा. विदर्भ (पहिला डाव) : ४५.३ षटकांत सर्वबाद १०५ धावा. मुंबई (दुसरा डाव) : १३०.२ षटकांत सर्वबाद ४१८ धावा. विदर्भ (दुसरा डाव) : अथर्व तायडे पायचीत गो. मुलानी ३२, ध्रुव शोरी त्रि. गो. कोटियन २८, अमन मोखाडे पायचीत गो. मुशीर ३२, करुण नायर झे. तामोरे गो. मुशीर ७४, यश राठोड पायचीत गो. कोटियन ७, अक्षय वाडकर पायचीत गो. कोटियन १०२, हर्ष दुबे झे. मुलानी गो. तुषार ६५, आदित्य सरवटे झे. रहाणे गो. तुषार ३, यश ठाकूर त्रि. गो. कोटियन ६, उमेश यादव त्रि. गो. कुलकर्णी ६, आदित्य ठाकरे नाबाद ०. अवांतर - १३. एकूण : १३४.३ षटकांत सर्वबाद ३६८ धावा. बाद क्रम : १-६४, २-६४, ३-११८, ४-१३३, ५-२२३, ६-३५३, ७-३५५, ८-३५६, ९-३६४, १०-३६८. गोलंदाजी : शम्स मुलानी ३५-९-७५-१; शार्दूल ठाकूर १२-०-४६-०; धवल कुलकर्णी ८.३-०-३८-१; तुषार देशपांडे १६-१-५३-२; तनुष कोटियन ३९-५-९५-४; मुशीर खान २४-३-४८-२.

 

Web Title: mumbai a record 42nd ranji trophy champion defeated vidarbha by 169 runs in the final match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.