Join us  

वर्ल्ड कपमध्ये कोहली 'वन डाऊन' येणार नाही; रवी शास्त्रींच्या 'प्लॅन'ला निवड समितीचाही पाठिंबा

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 1:53 PM

Open in App

मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी मालिका ही वर्ल्ड कपची रंगीत तालिम मानली जात आहे. कांगारूंविरुद्धच्या मालिकेती कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ निवडण्यात येणार आहे. या मालिकेत कर्णधार विराट कोहली संघात पुनरागमन करणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत कोहलीच भारतीय संघाचा हुकमी एक्का ठरणार आहे आणि त्यामुळेच ऑसींविरुद्धच्या त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पण, वर्ल्ड कप स्पर्धेत कोहलीनं वन डाऊन न येता चौथ्या क्रमांकावर खेळावं, अशी कल्पना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुचवली होती. माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी त्यावर नारीज प्रकट केली होती. 

कोहली हा भारतीय फलंदाजीचा कणा आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने वन डे क्रिकेटमध्ये 59.50 च्या सरासरीने 10533 धावा केल्या आहेत आणि त्यात 39 शतकांचा समावेश आहे. यापैकी 32 शतकं ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं झळकावली आहेत. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतानाही त्याचे विक्रम अचंबित करणारे आहेत. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 58.13 च्या सरासरीनं 1744 धावा केल्या आहेत, परंतु, 2015 च्या इंग्लंड दौऱ्यानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे.

दरम्यान, निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी शास्त्रींच्या प्लॅनला पाठिंबा दिला आहे. त्यांनी शास्त्रीच्या या कल्पनेचे कौतुक केलं आहे. ते म्हणाले,'' विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची रवी शास्त्री यांची कल्पना चांगली आहे. याची त्वरित अंमलबजावणी होणार नाही. कारण, कोहली तिसऱ्या क्रमांकावर जोरदार फटकेबाजी करत आहे आणि तो जगातील अव्वल फलंदाज आहे. पण, संघाला गरज असल्यास त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते.''

काय म्हणाले होते शास्त्री...''सामन्याची परिस्थिती पाहता पहिल्या तीन खेळाडूंच्या क्रमवारीत बदल केला जाऊ शकतो. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो आणि फलंदाजाची फळी मजबूत करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर एका खेळाडूला बढती दिली मिळू शकते. वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत, असे बदल होऊ शकतात. त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल,'' असे शास्त्री म्हणाले होते. 

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्रीआयसीसी विश्वकप २०१९भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया