विशाखापट्टणमची कालची रात्र ४२ वर्ष महेंद्रसिंग धोनीने गाजवली... दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत शिवम दुबे बाद झाल्यानंतर स्टेडियम MS Dhoni च्या नावाने दणाणून गेले... विशाखापट्टणम होतं तर दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राऊंड, परंतु इथे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांनीच तौबा गर्दी केलेली होती. अख्ख स्टेडियम पिवळ्या जर्सीने माखलं होतं आणि धोनीनं सामन्यातील शेवटची १५ मिनिटे गाजवली... पहिल्या दोन सामन्यांत फलंदाजीची संधी न मिळालेला धोनी बॅट घेऊन मैदानावर पाऊल ठेवताच संपूर्ण स्टेडियममध्ये एक ऊर्जा जागृत झालेली पाहायला मिळाली. CSK हरला याची पर्वा चाहत्यांना नव्हतीच, त्यांना फक्त धोनीच्या फलंदाजीचा मनमुराद आस्वाद लुटायचा होता.
विजयासाठी १९२ धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला १७१ धावाच करता आल्या आणि दिल्लीने २० धावांनी हा सामना जिंकला. पण, CSK फॅन्सला याचे दुःख नव्हतेच, कारण त्यांनी धोनीची आतषबाजी याची देही, याची डोळा पाहिली होती.
दिल्लीविरुद्धच्या या सामन्यानंतर धोनीचं १० वर्षांपूर्वीचं एक ट्विट व्हायरल झालं आहे आणि त्यात त्याने असे म्हटले होते की, कोणता संघ जिंकले याची पर्वा नाही, पण मी इथे इंटरटेनमेंट करायला आलो आहे. धोनीने त्याचे हे वाक्य १० वर्षानंतरही खरं करून दाखवले. धोनीने १६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या.
डेव्हिड वॉर्नर ( ५२), रिषभ पंत ( ५१) व पृथ्वी शॉ ( ४३ ) या आघाडीच्या तीन फलंदाजांनी दिल्लीला ५ बाद १९१ धावांपर्यंत पोहोचवले. अजिंक्य रहाणे ( ४५ ) व डॅरील मिचेल ( ३४) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून चेन्नईचा डाव सावरला. इम्पॅक्ट प्लेअऱ शिवम दुबे ( १८) अपयशी ठरला. त्यानंतर धोनीने चांगली फटकेबाजी केली. रवींद्र जडेजा २१ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईला ६ बाद १७१ धावा करता आल्या.