नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या खूप चर्चेत आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. यामागील कारण देखील खास आहे, कारण क्रिकेटमध्ये अनेक ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीने टेनिसमध्ये देखील ट्रॉफी जिंकली आहे. महेंद्रसिंग धोनीने पुरुष दुहेरी स्पर्धेत जेएससीए टेनिस चॅम्पियनशिप जिंकून नवी किमया साधली आहे.
धोनीने रांचीतील एका स्पर्धेत स्थानिक टेनिसपटू सुमीत कुमार बजाजसह ही ट्रॉफी जिंकली. उल्लेखनीय बाब म्हणजे या जोडीने स्पर्धेत तीन वेळा विजय मिळवून एक जबरदस्त विक्रम केला. धोनी आणि बजाजचा ट्रॉफी घेतानाचा व्हिडीओ एका चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
ट्रॉफी जिंकणारा 'बादशाह'महेंद्रसिंग धोनी अनेकदा रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये टेनिस खेळताना पाहायला मिळतो. त्यामुळे त्याने टेनिसमध्येही ट्रॉफीवर कब्जा केला. दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र तो अजूनही इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्व करत आहे.
मंगळवारी आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये चेन्नईच्या फ्रँचायझीने अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याला संघातून बाहेर केले आहे. सीएसकेच्या पर्समध्ये आता २०.४५ कोटी रक्कम शिल्लक असून विदेशी खेळाडूंच्या २ जागा रिक्त आहेत.
रिलीज केलेले खेळाडू - ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, ॲडम मिल्न्, हरी निशांथ, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसीफ, नारायण जगदीसन.
संघात कायम राहिलेले खेळाडू - महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, शुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हणंगर्गेकर, ड्वेन प्रेटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीष पथिराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महीष थिक्साना.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"