Join us  

India vs Australia ODI: 'आता 'फिनिशर' म्हणून महेंद्रसिंग धोनीकडे पाहू नका'

India vs Australia ODI: धोनी एक दिग्गज आहे यात काहीच शंका नाही. पहिल्या सामन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील १० हजार धावांचा पल्ला पार केला. पण.......

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 10:51 AM

Open in App

>> अयाझ मेमन 

एकदिवसीय मालिकेची सुरुवात भारतासाठी अपेक्षेनुसार झाली नाही. धावांचा पाठलाग करताना भारताने आपले प्रमुख तीन फलंदाज झटपट गमावले. त्यामुळे अशा स्थितीतून सावरताना नेहमी अडचणी येतात. पण तरीही रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी संघाला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. विशेषकरून रोहितने शानदार खेळी करत शतक झळकावले. धोनीनेही अर्धशतक झळकावले, पण तरीही दोघांची भागीदारी संथ झाली. खासकरून धोनी खूप संथ खेळला.

त्याला सहजपणे धावा काढणे शक्य झाले नाही. याआधीही त्याच्यावर अशा संथ खेळीमुळे टीका झाली आहे. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला मंगळवारचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावाच लागेल.

धोनी एक दिग्गज आहे यात काहीच शंका नाही. पहिल्या सामन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील १० हजार धावांचा पल्ला पार केला. त्याने कसोटी क्रिकेटमध्येही खूप साऱ्या धावा केल्या आहेत. याशिवाय टी२० क्रिकेटमध्येही छाप पाडली आहे. कर्णधार म्हणून धोनीने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण एकूण त्याचा सध्याचा फॉर्म पाहता धोनी आगामी विश्वचषक स्पर्धेत लौकिकानुसार खेळू शकेल का, अशी शंका वाटत आहे. त्याच्या यष्टीरक्षणाविषयी कोणतेही प्रश्न उद्भवत नाही. त्यात तो सर्वोत्तम आहे. रिषभ पंत युवा असला, तरी त्याचे यष्टीरक्षण विशेष नाही. पण तरी धोनीकडून वेगात धावा काढण्याचीही अपेक्षा आहे आणि यामध्ये तो मागे पडतोय. गेल्या दीड वर्षामध्ये त्याच्या बॅटमधून धावाही निघत नव्हत्या, पण आता पहिल्या सामन्यात त्याने धावा काढल्या ही दिलासादायक बाब आहे.

त्यामुळेच तो आपल्या जुन्या फॉर्ममध्ये येत असल्याचा विश्वास वाटू लागला आहे. असे असले तरी एक फिनिशर म्हणून आता धोनीकडून अपेक्षा ठेवल्या गेल्या नाही पाहिजेत. या भूमिकेसाठी केदार जाधवला खेळविण्यात आले पाहिजे आणि विश्वचषक स्पर्धेसाठी पंतला संघात घेतले पाहिजे असे मला वाटते.

रोहित शर्मानेही पहिल्या सामन्याआधी म्हटले होते की, धोनीने चौथ्या स्थानी फलंदाजी करायला पाहिजे. धोनीकडे खूप मोठा अनुभव आहे आणि या जोरावर तो संघाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावरू शकतो. पण यासोबतच त्याला आपला स्ट्राइक रेटही वाढवावा लागला.

तसेच धोनीची विशेषता म्हणजे सर्वच खेळाडू मान्य करतात की, तो सामना पटकन ओळखतो. सामन्याची परिस्थिती चांगल्या प्रकारे ओळखत असल्याने धोनीची केवळ उपस्थितीच सर्वांसाठी मोलाची ठरते. त्यामुळेच जर त्याने आपला फलंदाजीचा फॉर्म मिळवला, तर त्याच्यासारखा दुसरा बहुमूल्य खेळाडू कोणताही नसेल.

(लेखक 'लोकमत'चे संपादकीय सल्लागार आहेत.) 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामहेंद्रसिंग धोनी