Join us  

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा दौरा गाजवून धोनी भारतात परतला

ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी धोनी संपला, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 8:01 PM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात नेत्रदीपक कामगिरी करून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतात परतला आहे. धोनीच्या चाहत्यांनी त्याचा भारतातील विमानतळावरचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० मालिकेसाठी धोनीला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांनंतर धोनी ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी दाखल झाला. ऑस्ट्रेलियातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये धोनीने तीन अर्धशतके झळकावली होती. त्याचबरोबर दोन सामन्यांमध्ये धोनीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. धोनीला यावेळी मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. धोनीने न्यूझीलंड दौऱ्यातही आपली चमक दाखवली होती. ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी धोनी संपला, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु होती. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यातील दमदार कामगिरीच्या जोरावर धोनीने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

हा पाहा व्हिडीओ

 भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 2019 ची दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग तीन अर्धशतक, सामनावीरचा पुरस्कार आणि त्यानंतर न्यूझीलंड मालिकेत फटकेबाजी करत धोनीनं टीकाकारांची बोलती बंद केली. आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि याही मालिकेत कॅप्टन कूल धोनी कांगारूंचं कंबरडं मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत धोनीला विश्वविक्रम नोंदवून दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरला मागे टाकण्याची संधी आहे. 

धोनीच्या नावे असंख्य विक्रम आहेत. भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून देण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामने खेळल्यात धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा यष्टिरक्षक म्हणून धोनीच्या नावे विक्रम नोंदवला जाणार आहे. बाऊचरच्या नावावर 596 आंतरराष्ट्रीय सामने आहेत, तर धोनी ( 594) दोन सामन्यांच्या पिछाडीने दुसऱ्या स्थानावर आहे. या विक्रमात श्रीलंकेचा कुमार संगकारा ( 499) आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट ( 485) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावरऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया