Join us  

... म्हणून धोनीनं घेतलीय विश्रांती; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चा हेतू 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल की नाही, याबबात साशंकता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:35 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल की नाही, याबबात साशंकता आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेतून धोनीनं विश्रांती घेतली आहे. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी रिषभ पंतला पुरेसा वेळ मिळावा, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) प्रयत्नशील आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती घेईल अशी शक्यता होती, परंतु अद्याप त्याबाबत स्पष्टता मिळालेली नाही. पण, धोनीनं वेस्ट इंडिजपाठोपाठ आफ्रिकेविरुद्धही न खेळण्याचा निर्णय घेतल्यानं पुन्हा निवृत्तीची चर्चा रंगू लागली आहे.

38 वर्षीय धोनीनं नोव्हेंबर महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही तो संघाचा सदस्य नसेल. मात्र, त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 मालिकेतून तो कमबॅक करू शकतो. IANSला मिळालेल्या माहितीनुसार धोनीनं विश्रांती घेण्यामागे एक कारण आहे. 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पंत आणि त्याच्यासारख्या उदयोन्मुख यष्टिरक्षकांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. धोनी पुन्हा टीम इंडियाकडून खेळेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. पण, पंत किंवा अन्य युवा यष्टिरक्षक अपयशी ठरल्यास धोनी हा संघाचा बॅकअप प्लान असेल. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत रिषभ पंतची अपयशाची मालिका कायम राहिली आहे. त्यामुळे निवड समितीचं टेंशन वाढलेलं आहे. पंतचा असाच फॉर्म कायम राहिल्यास निवड समिती संजू सॅमसन, इशान किशन यांना संधी देऊ शकते. धोनी हा त्यांचा आपत्ती व्यवस्थापक आहेच.

महेंद्रसिंग धोनी आता बस कर... भारताच्या माजी कर्णधारानं दिला सल्लाभारताचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी धोनीला आता बस कर... असा सल्ला दिला आहे. ते म्हणाले,'' महेंद्रसिंग धोनीच्या मनात नेमकं काय आहे, हे कुणालाही माहित नाही. भारतीय संघातील त्याच्या भविष्याबद्दल तोच सांगू शकतो, परंतु मला वाटतं तो आता 38 वर्षांचा आहे आणि टीम इंडियानं पुढील विचार करायला हवा. कारण, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंत धोनी 39 वर्षांचा होईल.'' 

''धोनीचं संघासाठीच्या योगदानाचा मुल्यमापन कुणीच करू शकत नाही. केवळ धावाच नव्हे, तर यष्टिंमागूनही त्यानं संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. संघात त्याचं असणे हे केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर कर्णधाराच्याही फायद्याचे असते. त्याचा अनुभव आणि नेतृत्वगुणाचा संघालाच फायदा मिळतो. पण, आता ती वेळ आली आहे,'' असे गावस्कर यांनी पुढे स्पष्ट केले. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरिषभ पंतबीसीसीआय