Join us  

Why MS Dhoni again took captancy? : पुन्हा CSK चे कर्णधारपद का स्वीकारले?; महेंद्रसिंग धोनीने खरे कारण सांगितले, रवींद्र जडेजाबद्दल म्हणाला...  

MS Dhoni, Ravindra Jadeja : महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) कर्णधारपदी पुन्हा विराजमान होताच विजयही त्याच्या मागोमाग आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 12:08 AM

Open in App

MS Dhoni, Ravindra Jadeja : महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) कर्णधारपदी पुन्हा विराजमान होताच विजयही त्याच्या मागोमाग आले. चेन्नईने रविवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) वर १३ धावांनी विजयाची नोंद केली. ९ सामन्यांमधील चेन्नईचा हा तिसरा विजय ठरलाय अन् ते अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत. ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांच्या १८२ धावांच्या विक्रमी भागीदारीनंतर मुकेश चौधरीने ( ४ विकेट्स) कमाल केली. रवींद्र जडेजा व महिशा थिक्साना यांनी टिच्चून मारा करताना SRHच्या धावगतीवर वेसण घातले. CSKने कॅच सोडल्या असल्या तरी सांघिक खेळ करताना हा विजय मिळवला. धोनीने कॅप्टन डोकं वापरून गोलंदाजांचा योग्य वापर केला अन् तसे क्षेत्ररक्षणही लावले.

ऋतुराजने ५७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ९९ धावा केल्या. ऋतुराज व डेवॉन कॉनवे ( Devon Conway ) या जोडीने १८२ धावांची विक्रमी भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आता ऋतुराज व कॉनवे या जोडीच्या नावावर नोंदवला गेला आहे. विराट व एबी यांचा १५७ धावांचा विक्रम आज मोडला गेला. कॉनवेने ५५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा करताना चेन्नईला २ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएलमध्ये सर्वाधिक २२ वेळा २००+ धावा करण्याचा विक्रम CSKने नावावर करताना RCB ला ( २१) मागे टाकले.  

हैदराबादकडून केन विलियम्सन ( ४७), अभिषेक शर्मा ( ३९) या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. निकोलस पूरनने ३३ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६४ धावा करून अखेरपर्यंत खिंड लढवली. पण, हैदराबादला ६ बाद १८९ धावा करता आल्या. मुकेश चौधरीने ४६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. त्याने टाकलेल्या २०व्या षटकात २५ धावा आल्या. मिचेल सँटनर व ड्वेन प्रेटोरियस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

महेंद्रसिंग धोनीने पुन्हा कर्णधारपद का स्वीकारले? 

सान्यानंतर धोनी म्हणाला,''आयपीएलच्या मागील पर्वातच रवींद्र जडेजाला हे माहीत होते की त्याला पुढे CSK चे नेतृत्व सांभाळायचे आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दोन सामन्यांत मी त्याच्यावर एकदम जबाबदारी टाकली नाही. मी त्याच्या निर्णयावर लक्ष ठेऊन होतो. पण, २-३ सामन्यानंतर त्याला मी निर्णय व जबाबदारी घेण्यास सांगितली.''

''जेव्हा तुम्ही कर्णधार होता, तेव्हा तुमच्याकडून अपेक्षाही उंचावतात. पण, कर्णधारपदाचे ओझे जडेजाला पेलवत नव्हते. शेवटी ही मानसिक कणखरता पाहणारी जबाबदारी आहे. कर्णधारपदाचा जडेजाच्या मानसिक कणखरतेवर परिणाम होताना मला दिसला आणि त्या ओझ्याखाली त्याची कामगिरी खालावत गेली. मला जडेजा उत्तम गोलंदाज, फलंदाज आणि अफलातून क्षेत्ररक्षक म्हणून हवाय. त्यामुळे त्याच्यावर अधिक ओझे थोपवायचे नव्हते,''हे धोनीने स्पष्ट केले.

''तुमचं डोकं जेव्हा खूपच काम करायला लागतं तेव्हा कर्णधाराला झोपेतही विश्रांती मिळत नाही. या पर्वाच्या अखेरीस जडेजाला हे वाटायला नको की तो फक्त टॉससाठी यायचा आणि खरं नेतृत्व दुसरंच करत होता,''असेही धोनी म्हणाला. 

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App