Join us  

'फिनिशर' धोनीचं टी-20 करिअर 'फिनिश'?; 'हे' उत्तर बरंच काही सांगून जातंय!

गेल्या काही महिन्यांपासून महेंद्रसिंग धोनी मैदानावर चाचपडताना-झगडताना दिसतोय. 'धोनी मार रहा है' हे वाक्य ऐकून तर जमाना झालाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 10:23 AM

Open in App

पुणेः 'कॅप्टन कूल' हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या, पहिल्या टी-20 वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरणाऱ्या आणि सर्वश्रेष्ठ 'फिनिशर'च्या यादीत जाऊन बसलेल्या महेंद्रसिंग धोनीची टी-20 कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर आल्याची चिन्हं दिसताहेत. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात धोनीला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अशातच, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी, नव्या यष्टिरक्षकाचा शोध सुरू केल्याचं सांगून सूचक इशारा दिला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून महेंद्रसिंग धोनी मैदानावर चाचपडताना-झगडताना दिसतोय. 'धोनी मार रहा है' हे वाक्य ऐकून तर जमाना झालाय. त्याला सूरच सापडत नाहीए आणि त्याचा परिणाम स्वाभाविकच संघावर होतोय. एशिया कपमध्ये धोनीला चार डावांत फक्त 77 धावा करता आल्या होत्या. या वर्षातील दहा डावांमध्ये त्याची सरासरी अवघी 28.12 इतकी आहे. त्यामुळे, धोनीने आता थांबावं, असा सूरही ऐकू येतोय. या खराब फॉर्ममुळेच धोनीला वगळण्यात आलंय, हे नक्की. दुसरीकडे, धोनीपर्वाची सांगता होणार की काय, अशी चर्चाही सुरू झालीय. 

धोनीची टी-20 कारकीर्द संपली का?, या प्रश्नावर एमएसके प्रसाद यांनी, अजून नाही असं उत्तर दिलं. मात्र त्याचवेळी, दुसऱ्या यष्टिरक्षकाच्या जागेसाठी आम्हाला पर्याय पारखून पाहायचेत, असंही त्यांनी सूचित केलंय. ऋषभ पंत या तरुण-तडफदार शिलेदारावर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. विकेट्सच्या मागे आणि पुढे (फलंदाजीत) त्याने प्रभावी कामगिरी केली, तर त्याची जागा पक्की होऊ शकते. त्याशिवाय, दिनेश कार्तिक आणि कसोटीसाठी पार्थिव पटेल हे दोन पर्यायही अजमावून पाहिले जाऊ शकतात.   

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने ही अदलाबदल केली जातेय. त्यात आता कुणाला लॉटरी लागते, हे पाहावं लागेल.

 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजदिनेश कार्तिक