Join us  

महेंद्रसिंग धोनी वन डे क्रिकेटमधून लवकरच निवृत्ती जाहीर करणार, रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 1:48 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. CNN News18 ला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी धोनी लवकरच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, असे विधान केले आहे. पण, तो ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल, अशीही शक्यता त्यांनी वर्तवली आहे. धोनीनं यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

महेंद्रसिंग धोनी बर्फाच्या शहरात, जिवासोबत बनवला स्नोमॅन!

धोनी वन डे क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेईल, असे संकेत देताना शास्त्री म्हणाले की,''धोनी अनेक वर्ष तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्यानं 2014मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता तो वन डे क्रिकेटलाही रामराम करू शकतो. त्यानंतर या वयात तो ट्वेंटी-20 खेळणे पसंत करेल. त्यासाठी त्याला पुन्हा मैदानावर उतरावे लागेल.''

धोनीचं ट्वेंटी-20 करिअर अजूनही जीवंत आहे का, या प्रश्नावर शास्त्री म्हणाले,''इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो खेळणार आहे. धोनी कधीच स्वतःला संघावर लादणार नाही, हे मी त्याच्याबाबतीत स्पष्टपणे सांगू शकतो. आता आपण खेळू शकत नाही असं जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो कसोटीप्रमाणे निवृत्ती जाहीर करेल. तो भरपूर क्रिकेट खेळला आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर तो ट्वेंटी-20 त खेळत राहिल.''

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये तो खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. शास्त्री पुढे म्हणाले,'' धोनीनं जुलै 2019नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, परंतु त्यानं निवृत्तीबाबतची स्पष्टता दिलेली नाही. अशात ऑस्ट्रेलियातील त्याचा अनुभव संघाच्या कामी येऊ शकतो. आयपीएलमध्ये त्याचा सहभाग हा वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी समजली जात आहे. आयपीएलमध्ये त्यानं दमदार कामगिरी केली, तर त्याला टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघात खेळायला नक्की आवडेल.''

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरवी शास्त्री