Join us  

कोपरच्या क्रिकेट स्पर्धेत खासदार श्रीकांत शिंदेंनीही लुटला फलंदाजीचा आनंद

कोपर रोडनजीकच्या सुदाम म्हात्रे मैदानात सहा दिवसीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत तेथे स्पर्धा सुरु आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 5:59 PM

Open in App
ठळक मुद्दे स्पर्धेत ८० संघांमध्ये दुबईच्या संघाची हजेरी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायीचे सभापती रमेश म्हात्रेंनी केले आयोजन

डोंबिवली: कोपर रोडनजीकच्या सुदाम म्हात्रे मैदानात सहा दिवसीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत तेथे स्पर्धा सुरु आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही त्या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती लावली. स्पर्धेचे योग्य नियोजन बघून त्यांनाही खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही यथेच्छ बॅटींग करत चांगली खेळी केली. सभागृहात विरोधकांना शांत बसवणारे सभागृह नेते राजेश मोरे यांनी विकेटकिपींग केली, पण खासदार शिंदेंनी एकही बॉल पकडण्याची संधी त्यांना दिली नाही अशी उद्घोषणा होताच उपस्थितांमध्ये टाळयांचा कडकडाट झाला. स्पर्धेचे आयोजक, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनीही मैदानात येत खेळाची मजा लुटली. म्हात्रे यांचा उत्साह आणि खेळाविषयीचे प्रेम , खिलाडू आणि विजीगिषू वृत्तीचे खासदार शिंदेंनीही कौतुक केले.त्या ठिकाणी रत्नागिरी मुंबई,पुणे, भांडुप, ठाणे, डोंबिवलीतील पंचक्रोशीसह दुबई येथिल क्रिकेट संघ स्पर्धेसाठी सहभागी झाले असून एकूण ८० संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याची माहिती आयोजक मनोज म्हात्रे, प्रविण म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे आदींनी दिली. दुबईतील संघाने या ठिकाणी येत स्पर्धेचा दर्जा वाढवल्याबद्दल रमेश म्हात्रेंनी समाधान व्यक्त केले. तेथून येथे केवळ स्पर्धेसाठी आलेले स्पर्धल हे मुळचे दिवा-डोंबिवली परिसरातील वास्तव्याला होते, पण आता नोकरी- व्यावसायानिमित्त ते दुबईत असतात अशीही माहिती देण्यात आली. दुबईत वास्तव्याला गेले तरीही मातीशी असलेली नाळ त्यांनी कायम ठेवली असून येथिल क्रिकेट स्पर्धेसाठी ते आवर्जून आले त्यासाठी मातृभूमिचे प्रेम, ओढ लागते, त्या युवकांनी ती जपली हा विज्ञान युगात आदर्शच म्हणावा लागेल असेही मनोज म्हात्रे म्हणाले. सहा दिवस चालणा-या या स्पर्धेमुळे कोपर भागात या स्पर्धेची चर्चा रंगली असून स्पर्धेचे उत्तम नियोजन असल्याची सहभागींनीही प्रतिक्रिया दिली. प्रत्येकी ५ ओव्हर सहभागी संघांना खेळायला मिळत असून सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत स्पर्धा सुरु आहेत.

टॅग्स :डोंबिवलीकल्याणएकनाथ शिंदे