Join us  

पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा 'भोपळा', लाजिरवाण्या विक्रमात जगात अव्वल; भारत कितवा ? 

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघासमोर विजयासाठी 381 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 11:02 AM

Open in App

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघासमोर विजयासाठी 381 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मालिकेतील मानहानीकारक पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानचा संघ प्रयत्नांची शर्थ करत आहे. तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी 3 बाद 153 धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी आणखी 228 धावांची गरज आहे. या सामन्यात पाकिस्तान विजय मिळवेल की नाही हे त्यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. मात्र, या मालिकेत त्यांनी एक लाजीरवाणा विक्रम नावावर केला आहे. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेचे त्यांच्यावर पहिल्या दोन कसोटीत पराभवाची नामुष्की ओढावली. तिसऱ्या कसोटीतही तशीच चिन्ह आहेत. या कसोटीच्या पहिल्या डावात अझर अली आणि असद शफिक यांना एकही धाव करता आली नाही. त्यांच्या या अपयशामुळे पाकिस्तान संघावर एक नामुष्की ओढावली. 

मागील तीन वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्र अव्वल ( 1-6 ) फलंदाज सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले आहेत. तीन वर्षांतील आकडेवारीनुसार 28 कसोटी सामन्यांत पाकिस्तानच्या फलंदाजांना 34वेळा भोपळाही फोडता आलेला नाही. भोपळ्याच्या या विक्रमात त्यांनी अव्वल स्थान गाठत श्रीलंकेला ( 34 सामने 33 भोपळे ) मागे टाकले. भारत या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाला 38 सामन्यांत 28 भोपळे मिळाले आहेत.

टॅग्स :पाकिस्तानद. आफ्रिकाबीसीसीआय