Join us

एअरपोर्टवरून थेट वडिलांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला मोहम्मद सिराज; Emotional फोटो व्हायरल

कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला

By स्वदेश घाणेकर | Updated: January 21, 2021 16:05 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर २-१ असं लोळवल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू मायदेशात परतले. या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. सिराजचे वडील मोहम्मद गौस ( Mohammed Ghouse) यांचे २० नोव्हेंबरला निधन झाले. त्याच्या एक आठवड्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला होता आणि कोरोना नियमांमुळे सिराजला वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी मायदेशात परतता आले नाही.

वडिलांच्या जाण्याचं दुःख मनाशी कवटाळून सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळला आणि प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या गोलंदाजांचे नेतृत्व सांभाळले. त्यानं ब्रिसबेन कसोटीत पाच विकेट्स घेतल्या. या पूर्ण मालिकेत भारताकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला.  सामन्यातील प्रत्येक विकेटनंतर सिराज आकाशाच्या दिशेनं दोन्ही हात उंचावून वडिलांना श्रद्धांजली वाहत होता. आपल्या मुलानं देशाचे प्रतिनिधित्व करावं, हे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, परंतु ते स्वप्न सत्यात उतरलेलं त्यांना पाहता आलं नाही. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता.  सिराजचा भाऊ मोहम्मद इस्माइलनं एक दिवसांपूर्वी सांगितले होते की,''सिराजनं टीम इंडियासाठी कसोटी सामना खेळावे, हे वडिलांचे स्वप्न होते. त्यांना सिराजला निळ्या व पांढऱ्या जर्सीत पाहायचे होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. आम्ही घरात आनंद साजरा केला नाही, परंतु सोसायटी आणि हैदराबाद मध्ये टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला गेला.''

 

स्थानिक स्पर्धांमध्ये सिराज जेव्हा पहिला सामना खेळला तेव्हा त्यानं २० धावा देत ९ विकेट्स घेतल्या आणि त्यासाठी त्याला ५०० रुपये बक्षीस मिळाले होते.  क्रिकेटनं दिलेला हा पहिला पुरस्कार होता. सिराजचे वडील रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी मुलांच्या स्वप्नांत परिस्थिती कधीच आड आणली नाही. मुलांच्या स्वप्नांसाठी ते दिवसरात्र मेहनत करत राहिले. हलाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोहम्मद सिराज मोठा झाला. 

टॅग्स :मोहम्मद सिराजभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया