Join us  

हसीनबरोबरचे संभाषण मोहम्मद शामीने केले उघड; प्रकरणाला मिळाले वेगळे वळण

आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे शामीने यापूर्वी म्हटले आहे. त्याचबरोबर या सर्व भांडणांचा कुटुंबियांवर विपरीत परिणाम होत आहे आणि कुटुंबियांसाठी हसीनने आरोप करणे बंद करावे, असेही शामीने म्हटले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 5:31 PM

Open in App
ठळक मुद्देहे संभाषण जाहीर केल्यानंतर हसीन नेमके काय वक्तव्य करते, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोलकाता : आपली पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांनंतर मोहम्मद शामीने दोघांचे दूरध्वनी संभाषण सर्वांसमोर आणले आहे. हसीनने शामीविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी हसीनची भूमिका आहे. पण या संभाषणात मात्र हसीनने असे म्हटलेले नाही.

हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे.

आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे शामीने यापूर्वी म्हटले आहे. त्याचबरोबर या सर्व भांडणांचा कुटुंबियांवर विपरीत परिणाम होत आहे आणि कुटुंबियांसाठी हसीनने आरोप करणे बंद करावे, असेही शामीने म्हटले होते. हे भांडण घरामध्ये सोडवायला हवे, असेही शामीने हसीनला सांगितले होते. पण हसीनने मात्र या गोष्टीला नकार दिला आहे. जर शामीला शिक्षा झाली नाही तर हा स्त्रीचा अपमान असेल, असे हसीनने म्हटले आहे. या वादात आपल्याला समर्थन मिळावे, म्हणून हसीनने थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे दार ठोठावले आहे.

शामीने मात्र आपल्याबरोबर हसीनने केलेले संभाषण उघड केले आहे. यामध्ये हसीन म्हणाली आहे की, " जर शामीने माझी माफी मागितली आणि पुन्हा धोका न देण्याचे वचन दिले तर पुन्हा एकदा आमचा संसार नव्याने सुरु करता येईल. "

हे संभाषण जाहीर केल्यानंतर हसीन नेमके काय वक्तव्य करते, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीममता बॅनर्जी