खापरखेडा (नागपूर) - भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यावर पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांचे कनेक्शन सावनेर तालुक्यातील दहेगाव (रंगारी)शी असल्याचे कळते. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस दहेगाव (रंगारी) येथे येणार
असल्याचे खापरखेडा पोलिसांनी सांगितले.
शमी प्रकरणाशी संबंधित एक तरुणी दहेगाव (रंगारी) येथील रहिवासी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तिचे वडील ट्रकचालक असून, तिने कोराडी येथील विद्यामंदिर हायस्कूल आणि नागपूर येथील तिरपुडे महाविद्यालयात शिक्षण घेतल्याने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून कळते. शिवाय, तिने फेसबुकवर शमीसोबतचा फोटो अपलोड केला होता.
सध्या ही तरुणी दहेगाव येथील तिच्या घरी नसल्याचेही कळते. ती नेमकी कुठे आहे, याबाबत कुणालाही माहिती नव्हती.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस येत्या २४ तासांत दहेगाव (रंगारी) येथे येणार असल्याचे खापरखेडा पोलिसांनी सांगितले.