Pakistan Cricket Mohammad Rizwan: पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक नवीन वाद सुरू झाला आहे. या वादामागील मूळ कारण म्हणजे पाकिस्तानचा स्टार खेळाडू मोहम्मद रिझवान याची नाराजी आणि बंड. पाकिस्तानच्या रिझवानने संघनिवडीवरून नाराज झाल्यानंतर आता पाक क्रिकेट बोर्डाविरूद्ध बंड पुकारले आहे. त्याने नुकताच पीसीबीविरुद्ध एक मोठा निर्णय घेतला आहे.
रिझवानने घेतला मोठा निर्णय
मिळालेल्या वृत्तानुसार, रिझवानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. केंद्रीय करारात एकूण ३० पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, परंतु आतापर्यंत फक्त २९ खेळाडूंनीच करारावर स्वाक्षरी केली आहे. रिझवान हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही.
रिझवानचे बंडाचे निशाण
मोहम्मद रिझवानच्या या निर्णयामागील कारण काय? त्याने PCBच्या केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास का नकार दिला? असे अनेक सवाल विचारण्यात येत आहेत. रिझवानच्या बंडखोर भूमिकेमागे त्याला पाकिस्तान टी२० संघातून वगळण्यात आल्याचे कारण असल्याचे म्हटले जाते. वृत्तानुसार, केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी मोहम्मद रिझवानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टी२० संघातून काढून टाकण्याबाबत प्रश्न विचारला. पाकिस्तानी स्थानिक माध्यमांमधील वृत्तानुसार, मोहम्मद रिझवानने केवळ टी२० संघातून काढून टाकण्यास आक्षेप घेतला, तसेच भविष्यासाठी काही अतिरिक्त मागण्या देखील केल्या. तथापि, केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी रिझवानने पीसीबीसमोर नेमक्या कोणत्या मागण्या ठेवल्या हे उघड केलेले नाही.
लहरी PCB कडून रिझवानने मागितले स्पष्टीकरण
जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा पीसीबीने कोणतीही पूर्वसूचना न देता मोहम्मद रिझवानला त्या संघातून वगळले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मनमानी कारभाराला कंटाळून, यष्टीरक्षक-फलंदाजाने स्वाक्षरी न करण्याचा निर्णय घेतला. टी२० संघातून वगळल्याबद्दल त्याने पीसीबीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.