Join us  

मोहम्मद कैफने केलं तिहेरी तलाकवरील निर्णयाचं स्वागत, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणकर्त्यांकडून ट्रोलिंग

'तू कुराण वाचलं आहेस का ?'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 10:18 AM

Open in App

मुंबई, दि. 23 - तिहेरी तलाकवर बंदी घातल्यानंतर देशभरातून सर्वोच्च न्यायलायच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. अनेकांनी यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्णयावर आपलं मत व्यक्त केलं. यामध्ये क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफचाही समावेश होता. मोहम्मद कैफने ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र काहीजणांनी त्याच्या ट्विटवर आक्षेप घेत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 

'तिहेरी तलाक असंवैधानिक असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत. यामुळे महिलांना सुरक्षा मिळेल. स्त्री-पुरुष समानता फार गरजेची आहे', असं ट्विट मोहम्मद कैफने केलं होतं. कैफच्या या ट्विटरवरुन अनेकांनी त्याला सुनावलं असून संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. 

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणा-या मोहम्मद कैफने तिहेरी तलाकच्या निर्णयाचं स्वागत करणं अनेकांच्या पचनी पडलं नाही. त्याला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कट्टरतावाद्यांनी मोहम्मद कैफला ट्रोल करताना इस्लामची शिकवण देण्याचाच प्रयत्न केला आहे. मोहम्मद कैफला ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र मोहम्मद कैफने कोणाचीही पर्वा न करता परखडपणे आपलं मत मांडलं आहे. 

फक्त कैफच नाही तर भारतीय संघाच्या इतर मुस्लिम खेळाडूंनाही अनेकदा अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. इरफान पठाण आणि मोहम्मद शामी यांनाही अनेकदा ट्रोल करत इस्लाम शिकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 

पत्नीसोबतच्या फोटोवरुन इरफान पठाणला केलं होतं ट्रोलभारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज इरफान पठाणने आपली पत्नी सफा बैगसोबत एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता, ज्यानंतर ट्विटरकरांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणा-या इरफान पठाणने टिकाकारांना अत्यंत शांतपणे सणसणीत उत्तर दिलं होतं. इरफान पठाणने पत्नीसोबत फोटो शेअर केल्यानंतर नेलपॉलिश, अर्धवट झाकलेले हात यामुळे त्याच्या चाहत्यांनी ट्रोल केलं होतं. तू पठाण आहेस, आणि एका पठाणाने आपल्या पत्नीसोबतचे असे फोटो टाकणं गैर असल्याचं इरफानच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं होतं. काहीजणांनी तर हे सर्व इस्लामविरोधी असल्याचं सांगितलं होतं. 

शामीवरही झाली होती टीकाभारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने फेसबूक आणि ट्टिवरवर आपली पत्नी आणि मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावरुन शामीला धर्म आणि संस्कृतीच्या रक्षकांकडून टीकेचा सामना करावा लागला होता. शामीच्या पत्नीने घातलेल्या कपड्यांवरुन टीका करत पुढच्या वेळी हिजाब परिधान करुन फोटो काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. काही लोक तर शामीला आपल्या पत्नीला ताब्यात ठेवायला जमत नसल्याचंही बोलले होते. तर काहींनी शामीच्या मुसलमान होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 

टॅग्स :क्रिकेट