Join us  

ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात 'तो' परतला, प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी

पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत ते 0-2 असे पिछाडीवर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 11:24 AM

Open in App

लाहोर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांच्या वर्ल्ड कप संघात डावखुरा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरचा समावेश केला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत ते 0-2 असे पिछाडीवर आहेत. तिसऱ्या वन डे सामन्यात 358 धावांचा डोंगर उभा करूनही पाकिस्तानला हार मानावी लागली. इंग्लंडने 6 विकेट आणि 31 चेंडू राखून हे लक्ष्य सहज पार करताना पाकिस्तानच्या गोलंदाजीची मर्यादा उघड केल्या. 

मोहम्मद आमीर गेल्या काही सामन्यांत कामगिरीशी झगडत होता, त्यामुळे पाकिस्तानी निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. पण, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. आमीरच्या समावेशामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजीला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आमीरला कांजण्या झाल्या असून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर, कर्णधार सर्फराज अहमद आणि निवड समिती प्रमुख इंझमान-उल-हक यांना आमीर वेळेत बरा होईल, अशी आशा आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या वन डे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर इंग्लंडने पुढील दोन सामने जिंकले. या दोन्ही सामन्यांत 350+ धावा झाल्या. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतही धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानने उभे केलेले 358 धावांचे लक्ष्य इंग्लंडच्या खेळाडूंनी 6 विकेट आणि 31 चेंडू राखून सहज पार केले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये धावांचा रतीब रचणाऱ्या जॉनी बेअरस्टोची बॅट राष्ट्रीय संघाकडूनही चांगलीच तळपली. त्याच्या तुफानी खेळीला अन्य फलंदाजांची तोडीस तोड साथ मिळाली. 

जेसन रॉय आणि बेअरस्टो यांनी दीडशतकी भागीदारी करून देताना इंग्लंडला मजबूत पाया रचून दिला. रॉयने 55 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. त्यानंतर बेअरस्टोनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 93 चेंडूंत 15 चौकार व 5 षटकार खेचत 128 धावा चोपल्या. त्याला जो रूट ( 43), बेन स्टोक्स ( 37) आणि मोईन अली ( 46*) यांची उत्तम साथ लाभली. इंग्लंडने 44.5 षटकांत 4 फलंदाज गमावून हे लक्ष्य पार केले. 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९पाकिस्तान