Join us  

बीसीसीआयच्या विराटभक्तीपुढे मोदी भक्तही फिके

बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अधिकारी हे कर्णधार विराट कोहलीचे भक्त असून यांच्यासमोर मोदी भक्तही फेल आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 2:00 PM

Open in App

नवी दिल्ली - बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अधिकारी हे कर्णधार विराट कोहलीचे भक्त असून यांच्यासमोर मोदी भक्तही फेल आहेत', अशी टीका प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील दोन्ही कसोटीत भारताचा दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली व भारतीय संघावर टीका होत आहे. रामचंद्र गुहा यांनी विराटसोबतच कोच रवी शास्त्री यांच्यावरही टीका केली आहे. 

लोढा समितीच्या ज्या शिफारशी बीसीसीआयमध्ये लागू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जी प्रशासकीय समिती बनवली होती त्या समितीत रामचंद्र गुहा हे सदस्य होते. परंतु, काही कारणास्तव रामचंद्र गुहा यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. गुहा यांनी एका दैनिकात लेख लिहिला असून त्यात कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका केली आहे. बीसीसीआय अधिकारी, निवड समिती आणि कोचिंग स्टाफ हे सर्व जण सध्या विराट कोहलीच्या भक्तीत बुडाले आहेत. कोणताही निर्णय घेण्याआधी ते कर्णधार विराट कोहलीचा सल्ला घेतात. त्यामुळेच भारतीय संघ परदेशात विजयी होत नाही, असे गुहा यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.  

भारतीय क्रिकेट बोर्ड कर्णधार विराट कोहलीला घाबरते. इतकेच काय दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हेदेखील विराटपुढे खुजे असून केवळ अनिल कुंबळे हाच विराटला पुरून उरला, भारताच्या क्रिकेट इतिहासात विराटला उत्तर देणारा केवळ अनिल कुंबळे हाच एकमेव असावा. रवी शास्त्रीला कोचिंगचा अनुभव नसताना त्याला जबाबदारी सोपविण्यात आली. विराटच्या तुलनेत शास्त्रीचे व्यक्तिमत्त्वदेखील खुजे ठरते. या शब्दात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे.

प्रशासकांच्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनीदेखील विराटपुढे स्वत:चे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता गहाण टाकली. असेच काहीसे क्रिकेट समितीने केले. सचिन, सौरभ, लक्ष्मण यांच्या समितीने टॉम मूडी यांच्याकडे डोळेझाक करीत रवी शास्त्रींची निवड केली. हे दिग्गज कोहलीपुढे घाबरल्यासारखे वागले. त्यांनी संस्थेला एका व्यक्तीकडे गहाण टाकले. सध्या कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि प्रशासक हे सर्वजण कर्णधार विराट कोहलीपुढे दुय्यम ठरले आहेत.

गुहा यांनी उपस्थित केलेले टीकात्मक मुद्दे बीसीसीआयमध्ये मी चार महिने काम केले. या काळात विराटने बीसीसीआयवर वर्चस्व मिळविल्याचे माझ्या लक्षात आले. बोर्डाचे अधिकारी सर्वाधिक लांगूलचालन विराटचेच करतात. खुषमस्करीची ही कृती मोदी यांचे कॅबिनेटमंत्री करतात त्यापेक्षा कैकपटींनी अधिक आहे. भारतीय कर्णधाराच्या अधिकारकक्षेत येत नसलेले मुद्देदेखील बोर्डाचे अधिकारी विराटच्या झोळीत टाकतात.  

टॅग्स :विराट कोहलीरामचंद्र गुहाबीसीसीआय