नवी दिल्ली : सलामीवीर फलंदाज मिताली राज आॅस्ट्रेलियाविरुद्ध वडोदरामध्ये १२ ते १८ मार्च या कालावधीत खेळल्या जाणा-या तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत भारताच्या १५ सदस्य महिला संघाचे नेतृत्व करणार आहे.
बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी म्हणाले, ‘महिला निवड समितीने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची निवड केली. ही मालिका आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा (२०१७-२०२०) भाग राहील.’
भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा यशस्वी ठरला. त्यात मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिका २-१ ने, तर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली पाच टी-२० सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकत दुहेरी यश संपादन केले.
भारत व आॅस्ट्रेलियादरम्यान पहिला एकदिवसीय सामना १२ मार्च रोजी खेळला जाणार आहे, तर त्यानंतर दोन सामने १५ व १८ मार्च रोजी खेळले जातील. (वृत्तसंस्था)
भारतीय महिला एकदिवसीय संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, सुषमा वर्मा, एकता बिष्ट, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, सुकन्या परिदा, पूजा वस्त्रकार आणि दीप्ती शर्मा.