लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवण्याची घटना इतिहासात गेमचेंजर म्हणून नोंद होईल, या यशामुळे त्यांना मोठ्या आर्थिक फायद्यासोबतच पुरुष क्रिकेटपटूंसारखा सन्मान मिळेल, असा विश्वास कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केला आहे.
ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्त वाय. के. सिन्हा यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सन्मानार्थ सोमवारी सायंकाळी एका विशेष कार्यकमाचे आयोजन केले होते. या वेळी ३४ वर्षीय मिताली म्हणाली, की आम्ही खूप चांगली कामगिरी केली आहे. भारतीय महिला क्रिकेट क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरेल. महिला क्रिकेटला आता वेगळ्या नजरेनं बघितले जाईल आणि सगळीकडे पुरुष क्रिकेटपटूंइतकाच महिला क्रिकेटपटूंनाही सन्मान मिळेल. महिला खेळाडूंनाही आता अनेक ब्रँड पुढे येतील. हा आमच्यासाठी नवा अनुभव असेल.
मिताली म्हणाली, की आमच्या कामगिरीमुळे अनेक मुलींना क्रिकेटकडे वळण्याची प्रेरणा मिळेल. आमच्या संघाच्या कामगिरीमुळे भारतात महिला क्रिकेटचा पाया मजबूत झाला आहे. नव्या पिढीला आता यामध्ये कारकीर्द करण्याची संधी दिसेल.