वेलिंगटन : दुखापतीतून सावरल्यानंतर सलामीवीर मार्टिन गुप्टिल याला पाकिस्तानविरुद्धच्या पाच एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या १३ सदस्यीय संघात सामील करण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या निवडकर्त्यांनी मिशेल सेंटनर आणि टाड एस्टल या फिरकी जोडीला सुद्धा संधी दिली आहे.
पायातील मांसपेशीतील तणावामुळे तो गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. ज्यात यजमान संघाने ३-०ने मात केली होती. हा खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० सामन्यात मात्र प्रतिनिधीत्व करीत आहे. गुप्टिलच्या पुनरागमनानंतर जॉर्ज वर्करला बाहेर ठेवण्यात आले आहे. ज्याने आपल्या गेल्या तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत सलामीवीर म्हणून दोन अर्धशतक झळकाविले होते. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला ६ जानेवारीपासून वेलिंग्टनच्या बेसिन रिजर्व येथून सुरुवात होईल. संघ असा : केन विलियमसन (कर्णधार), टाड एस्टल, डग ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, लाकी फर्ग्यूसन, मार्टिन गुप्टिल, मैट हेनरी, टाम लैथम, कोलिन मुनरो, हेनरी निकोल्स, मिशेल सेंटनर, टिम साउथी आणि रॉस टेलर.