कुणी अमेरिकेचा कॉमेडी चित्रपट ‘ग्राऊंडहोग’ पाहिला आहे का? या चित्रपटातील अभिनेता बिल मूरे हा टीव्हीवर हवामानाचा अंदाज देणाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा मनोरंजनात्मक चित्रपट आहे. प्रत्यक्षात असा अनुभव घेणे कुणालाही बरे वाटणार नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीला देखील अशाच एकसारख्या अनुभवाला सामोरे जावे लागले.
आम्ही सहा सामने खेळलो आणि सर्वच्या सर्व हरलो. कसे आणि का? आमची मिटिंग ठरल्यानुसार होते. मी पाहिल्यानुसार संघाचा बेस सर्वोत्कृष्ट आहे. सर्व खेळाडू कठोर मेहनत घेतात. मी असा सराव आजपर्यंत पाहिलेला नाही. आमच्या संघात अनेक प्रतिभावान खेळाडू असल्याने संतुलन फार चांगले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून आम्ही फारच चांगली प्रगती करू, याबद्दल मी आशावादी होतो. सध्या मात्र आमचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. प्ले आॅफसाठी उरलेले आठही सामने जिंकावे लागतील.
अखेर कुठे चूक झाली? घरच्या मैदानावर झालेल्या मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हरलो. संथ खेळपट्टीवर १४९ धावांचा बचाव आम्हाला करता आला
नाही. हजारो निराश चाहत्यांच्या आशांवर पाणी फेरणारा आमचा संघ प्रशिक्षक गॅरी कस्टर्नसोबत मंथन करीत होता. मी काय विचार
करतो, असा मला प्रश्न करण्यात आला. क्रिकेटमध्ये एखाद्या संघाच्या ताकदीचा अंदाज तुमचे क्षेत्ररक्षण
कसे आहे, यावरून होतो, असे मी उत्तर दिले. प्रत्येक जण फलंदाज आणि गोलंदाज असतो. अशावेळी त्याचे लक्ष फलंदाजी आणि गोलंदाजीकडेच असेल हे समजू शकतो. तरीही प्रत्येक खेळाडू चांगला क्षेत्ररक्षक असल्याने सांघिक एजूटतेच्या बळावर सामना जिंकता येतो. नेमके याच पातळीवर आम्ही कामगिरीत ढेपाळतो आहोत. या मोसमात क्षेत्ररक्षण कमालीचे ढिसाळ ठरले. प्रत्येक सामन्यात अनेक झेल सोडण्याची जोखीम पत्करू शकत नाही.
जय-पराजयाचे अंतर कमी असेलही, पण घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि केकेआरला सहज नमवू शकलो असतो. दिल्लीविरुद्ध आणखी २० धावा असत्या तर सामन्याचा निकालही आमच्या बाजूने लागला असता. सहापैकी किमान तीन सामने जिंकून गुणतालिकेत आव्हान ठेवता आले असते. यापुढेही आम्हाला सकारात्मक आणि सांघिक खेळावर भर द्यावा लागणार आहे. होमपिचवर आलेला कटू अनुभव टाळण्यासाठी विजयाचा मार्ग धरावा लागणार आहे.