सेंट मौरित्ज (स्वित्झर्लंड) : ‘आयपीएल’ चॅम्पियन मुंबई इंडियन्सने बुधवारी श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याची गोलंदाजी मेंटॉर म्हणून निवड केल्यानंतर मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहे. त्याने निवृत्ती घेणार असल्याचा इशारा देताना म्हटले की, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास मानसिकरीत्या खूप थकलो असून आता माझी आयपीएल कारकिर्दही संपुष्टात आली आहे.’
मलिंगा एका दशकापासून मुंबई इंडियन्सचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने मुंबईच्या १५७ सामन्यांपैकी ११० सामने खेळले आहे. सेंट मौरित्ज येथे आइस क्रिकेट चँलेंज दरम्यान वृत्तसंस्थेला मलिंगाने म्हटले की, ‘क्रिकेट खेळून मी मानसिकरीत्या थकलो आहे. आता मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल असे वाटत नाही. अद्याप मी श्रीलंका क्रिकेटसह याविषयी चर्चा केली नाही, मात्र येथून मायदेशी परतल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळेल. या स्पर्धांतून माझी शारिरीक क्षमता आजमावेल. आता माझी आयपीएल कारकिर्दही संपुष्टात आली असून मला मुंबई इंडियन्ससह नवी इनिंग सुरु करायची आहे.’
‘प्रत्येक खेळाडूला अशा प्रसंगाची जाणीव होते. वसिम
अक्रम सारख्या महान गोलंदाजालाही आपली वेळ पूर्ण झाली
असल्याची जाणीव झाली
होती,’ असेही मलिंगाने यावेळी म्हटले. (वृत्तसंस्था)