Join us

महेंद्रसिंग धोनी आणखी दोन वर्षे खेळेल; फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांना आशा

किती वर्षे खेळायचे याबाबत अखेर निर्णय त्यालाच घ्यावा लागणार आहे. तो एवढ्यात कोणताही निर्णय घेईल, असे मला वाटत नाही. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2024 11:04 IST

Open in App

बंगळुरू: जादूई क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी शानदार फलंदाजी करत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षे तो चेन्नईसाठी खेळू शकतो, अशी आशा चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांनी व्यक्त केली आहे.

आयपीएल २०२४ ला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची धुरा सोपवून ४२ वर्षीय धोनीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

हसी म्हणाले की, धोनी एवढी चांगली फलंदाजी करत आहे की तो खेळत राहावा, अशी आम्हाला आशा आहे. तो सराव शिबिरात लवकर येऊन खूप मेहनत घेतो आणि पूर्ण सत्रात फॉर्मात आहे. आम्ही त्याच्यावरील ताण व्यवस्थितपणे हाताळू शकलो आहोत. मागील सत्रानंतर त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या मोसमातील सुरुवातीच्या टप्प्यापासून तो या स्पर्धेचे व्यवस्थापन करत आहे. किती वर्षे खेळायचे याबाबत अखेर निर्णय त्यालाच घ्यावा लागणार आहे. तो एवढ्यात कोणताही निर्णय घेईल, असे मला वाटत नाही. 

धोनीचे नेतृत्व सोडण्याच्या बाबतीत हसी म्हणाले की, स्पर्धेच्या आधी कर्णधारांच्या बैठकीत सहभागी होणार ३२६ नाही, असे धोनीने सांगितल्यावर आम्ही चकित झालो. त्यानंतर त्याने ऋतुराज कर्णधार होईल, असे सांगितले. सुरुवातीला धक्का बसला; पण ऋतुराज ही योग्य निवड असल्याचे आम्हाला माहीत होते.

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४