महेंद्रसिंग धोनी सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी - फारूख इंजिनीयर

छोट्या शहरांमधील गुणवत्ता भारतीय क्रिकेटसाठी सकारात्मक बाब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 09:19 AM2024-02-15T09:19:14+5:302024-02-15T09:20:10+5:30

whatsapp join usJoin us
Mahendra Singh Dhoni Inspirational For All Sportsmen - Farooq Eng | महेंद्रसिंग धोनी सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी - फारूख इंजिनीयर

महेंद्रसिंग धोनी सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी - फारूख इंजिनीयर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - ‘आज भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या शहरांचे असलेले वर्चस्व मोडून काढत लहान शहरांच्या खेळाडूंनी मोठी कामगिरी केली आहे. रांचीसारख्या लहान शहरातून आलेला महेंद्रसिंह धोनी जवळपास सर्वच खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरला. जम्मू-काश्मीरसारख्या राज्यातून क्रिकेटपटू नावलौकिक मिळवत आहेत, याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे,’ असे भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू फारूख इंजिनीयर यांनी म्हटले. 

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने इंजिनीयर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. इंजिनियर यांचा या निमित्ताने दादर येथे एका कार्यक्रमामध्ये विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचीही उपस्थिती होती. इंजिनीयर यांनी वेंगसरकर यांच्यासोबत क्रिकेट आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाला रंगत आणली. इंजिनीयर म्हणाले की, ‘जेव्हा कधी युवा खेळाडू भेटतात, तेव्हा मी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा करतो. महेंद्रसिंह धोनी, ऋषभ पंत यांसारख्या अनेक खेळाडूंना मी माझे अनुभव सांगितले. धोनीने यष्टिरक्षणाबाबत माझ्याकडून काही टिप्स घेतल्या होत्या. आज धोनी प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला आहे. आमच्याकाळी केवळ मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, कानपूर अशा शहरांतूनच खेळाडू यायचे.’ इंजिनीयर पुढे म्हणाले की, ‘छोट्या शहरांसह जम्मू-काश्मीरमधूनही क्रिकेटपटू चमकत आहेत. जागतिक स्तरावर अफगाणिस्तानने प्रभावित केले. त्यांचा खेळ मला खूप आवडतो. त्यांनी खूप कमी वेळेत आपला स्तर 
उंचावलेला आहे.’

तांत्रिकदृष्ट्या खेळ खूप बदलला आहे!
आधुनिक क्रिकेटविषयी इंजिनीयर म्हणाले की, ‘तांत्रिकदृष्ट्या खेळामध्ये मोठा बदल झाला. आमच्या काळी बॅटच्या खालच्या बाजूला मधोमध खूप लहान स्वीट स्पॉट होता. तिथे चेंडू अचूकपणे बसला, तर थेट सीमापार जायचा. पण आजच्या बॅट पूर्णपणे स्वीट स्पॉट झालेल्या आहेत. चेंडू कडेला लागला, तरी सीमापार जातो. आमच्यावेळी चेंडू बॅटच्या कडेला लागल्यास बळी जायचा.’ ‘सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप बदल झाले आहेत. आमच्यावेळी हेल्मेट नव्हते. पिंक प्लॅस्टिक बॉक्स मिळायचा. जर शरीराच्या नाजूक भागावर चेंडू लागला, तर तो बॉक्सही तुटायचा आणि फलंदाजाला वेदनाही व्हायच्या,’ असेही इंजिनीयर यांनी सांगितले.

Web Title: Mahendra Singh Dhoni Inspirational For All Sportsmen - Farooq Eng

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.