पुणे : महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यादरम्यान येथे मंगळवारी झालेल्या अ एलिट रणजी करंडकाची लढत अनिर्णीत राहिली. पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या छत्तीसगडने या सामन्यांत ३ गुणांची वसुली केली, तर महाराष्ट्राला एका गुणांवर समाधान मानावे लागले.
रायपूरमधील शहीद वीर नारायणसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत सुरू आहे. तथापि, हे दोन्ही संघ अ गटातील गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहेत. महाराष्ट्राचे सहा सामन्यांत सात गुण झाले असून, ते सातव्या, तर छत्तीसगड तितक्याच लढतीत सहा गुणांसह अखेरच्या स्थानावर आहे. छत्तीसगडने पहिल्या डावात ४६२ धावा केल्या होत्या, तर महाराष्ट्राने २३९ धावा केल्या. महाराष्ट्राने त्यांचा दुसरा डाव ९ बाद ३९७ धावांवर घोषित करताना छत्तीसगडसमोर विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य ठेवले व अखेरच्या दिवशी छत्तीसगड ६ बाद ९१ धावाच करू शकला होता. महाराष्ट्राकडून स्वप्निल गुगळेने ९ धावांत ३ व समद फल्लाहने २६ धावांत २ गडी बाद केले. केदार जाधवने अंकित बावणे याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी केली. अंकित व राहुल यांनी पाचव्या गड्यासाठी ७५ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राच्या धावसंख्येला मजबुती दिली. छत्तीसगडकडून ओंकार वर्माने ११० धावांत ४, तर पंकज रावने ११६ धावांत ३ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : पहिला डाव २३९. दुसरा डाव : ९ बाद ३९७ (घोषित) : (केदार जाधव १०३, अंकित बावणे ५७, मंदार भंडारी ५४, राहुल त्रिपाठी ४५. ओंकार वर्मा ४/११०, पंकज राव ३/११६). छत्तीसगड (पहिला डाव) : ४६२. दुसरा डाव : ६ बाद ९१. (अवनीश सिंग ४१. स्वप्निल गुगळे ३/९, समद फल्लाह २/२६).