लखनौ थरारकरीत्या बाद फेरीत; डीकॉक-राहुल यांची विक्रमी फटकेबाजी, कोलकाताचे आव्हान संपुष्टात

डीकॉक-राहुल यांची नाबाद द्विशतकी सलामी आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम सलामी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 09:09 AM2022-05-19T09:09:44+5:302022-05-19T09:10:26+5:30

whatsapp join usJoin us
lucknow supergiants thrashed out kolkata knight riders and quinton de kock and kl rahul make record | लखनौ थरारकरीत्या बाद फेरीत; डीकॉक-राहुल यांची विक्रमी फटकेबाजी, कोलकाताचे आव्हान संपुष्टात

लखनौ थरारकरीत्या बाद फेरीत; डीकॉक-राहुल यांची विक्रमी फटकेबाजी, कोलकाताचे आव्हान संपुष्टात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने अवघ्या दोन धावांनी बाजी मारताना कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. यासह लखनौने प्ले ऑफ प्रवेश निश्चित करताना पहिल्या क्वालिफायर लढतीसाठी आपली दावेदारी मजबूत केली. कोलकाताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

क्विंटन डीकॉक आणि कर्णधार लोकेश राहुल यांच्या नाबाद द्विशतकी सलामीच्या जोरावर लखनौने कोलकाताला २११ धावांचे कठीण आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने सांघिक कामगिरी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकले. तो बाद झाल्यानंतर कोलकाताचा डाव गडगडला. परंतु, रिंकू सिंग व सुनील नरेन यांनी सातव्या गड्यासाठी १८ चेंडूंत ५८ धावांचा तडाखा देत सामना कोलकाताच्या बाजुने झुकवला. मार्कस स्टोइनिसने अखेरच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर बळी घेत लखनौला थरारक विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात २१ धावांची गरज असताना रिंकूने स्टोइनिसला १८ धावांचा चोप दिला होता.

१३ चौकार, १४ षटकार

डीकॉकने ५९ चेंडूंत वादळी नाबाद शतक झळकावले. कोलकाताला लखनौचा एकही बळी घेता आला नाही. डीकॉकने ३६ चेंडूंमध्ये, तर राहुलने ४१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या दोन्ही फिरकीपटूंविरुद्ध राहुल-डीकॉक यांनी सावध पवित्रा घेतला. दोघांनी मिळून १३ चौकार आणि १४ षट्कारांची आतषबाजी करत कोलकाताची जबरदस्त धुलाई केली. प्रमुख वेगवान गोलंदाज साऊदीला ४ षटकांमध्ये ५७ धावांचा चोप देत राहिल-डीकॉक यांनी कोलकाताचे मानसिक खच्चीकरण केले. अखेरच्या पाच षटकांमध्ये लखनौने तब्बल ८८ धावा कुटल्या.

राहुल-डीकॉक यांची विक्रमी कामगिरी

- लोकेश राहुलने आयपीएलच्या सलग पाचव्या सत्रात ५०० धावांचा टप्पा पार केला.
- आयपीएलमध्ये पाच वेळा ५०० हून धावांचा टप्पा पार करणारा लोकेश राहुल चौथा फलंदाज ठरला.
- राहुलआधी अशी कामगिरी डेव्हिड वॉर्नर (६), शिखर धवन (५), विराट कोहली (५) यांनी केली.
- क्विंटन डीकॉकची खेळी आयपीएलमधील तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.
- डीकॉकने यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करताना जोस बटलरची (११६) खेळी मागे टाकली.
- डीकॉक-राहुल यांची नाबाद द्विशतकी सलामी आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम सलामी ठरली.

Web Title: lucknow supergiants thrashed out kolkata knight riders and quinton de kock and kl rahul make record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.