Join us  

KL Rahul, IPL 2022 : लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुलला निवडले, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूला ताफ्यात घेतले; ६० कोटी वाचवले

IPL 2022 : आधीच्या ८ संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली होती. आता अहमदाबाद व लखनौ यांनाही २२ जानेवारीपर्यंत त्यांनी करारबद्ध केलेल्या प्रत्येकी ३ खेळाडूंची नावे बीसीसीआयकडे सोपवायची आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 2:39 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वासाठी फेब्रुवारीच्या १२-१३ तारखेला मेगा ऑक्शन होणार आहे. अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींच्या आगमनामुळे IPL 2022पासून आता १० संघ जेतेपदासाठी खेळताना दिसतील. आधीच्या ८ संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली होती. आता अहमदाबाद व लखनौ यांनाही २२ जानेवारीपर्यंत त्यांनी करारबद्ध केलेल्या प्रत्येकी ३ खेळाडूंची नावे बीसीसीआयकडे सोपवायची आहेत. ESPNCricinfo नं दिलेल्या माहितीनुसार अहमबाद फ्रँचायझीनं हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशीद खान ( १५ कोटी) आणि शुभमन गिल ( ७ कोटी) यांना करारबद्ध केले आहे. लखनौ फ्रँचायझीनंही करारबद्ध केलेल्या खेळाडूंची नावं समोर आली आहेत.

लोकेश राहुल ( KL Rahul) हा लखनौ फ्रँचायझीच्या पहिल्या पसंतीचा खेळाडू होताच आणि त्यांनी त्याला करारबद्ध केले आहे. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस आणि अनकॅप भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोई ( Ravi Bishnoi) हे लखनौ फ्रँचायझीनं करारबद्ध केलेल उर्वरित दोन खेळाडू आहेत. ESPNcricinfoनं दिलेल्या वृत्तानुसार लखनौ फ्रँचायझीनं राहुलला १५ कोटी,  स्टॉयनिसला ११ कोटी आणि बिश्नोईला ४ कोटींत ताफ्यात घेताना आयपीएल मेगा ऑक्शनसाठी ( IPL 2022 Mega Auction) ६० कोटी वाचवले आहेत.  

RP Sanjiv Goenka Group ने लखनौ फ्रँचायझीची मालकी हक्क मिळवले. २९ वर्षीय लोकेश राहुल हा त्यांना त्यांच्या ताफ्यात हवाच होता. २०१८पासून राहुलची आयपीएलमधील कामगिरी दमदार झालेली आहे. मागील दोन पर्वात तो पंजाब किंग्सकडून खेळला. २०१३मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने, त्यानंतर २०१४ व २०१६ मध्ये अनुक्रमे सनरायझर्स हैदराबाद व बंगळुरूकडून तो खेळला. २०१८मध्ये पंजाब किंग्सनं त्याला ११ कोटींत ताफ्यात घेतले होते.  त्यानं ५५ सामन्यांत ५६.६२च्या सरासरीनं २५४८ धावा केल्या आहेत. त्यात २५ अर्धशतकं व दोन शतकांचा समावेश आहे. त्यानं २०१८ ते २०२१ या तीन पर्वात अनुक्रमे ६५९, ५९३ आणि ६२६ धावा केल्या.  

लखनौ ही मार्कस स्टॉयनिसची आयपीएलमधील चौथी  फ्रँचायझी असणार आहे. २०१५मध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आताची दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. २०२०मध्ये दिल्लीनं ४.८ कोटींत मार्कसला पुन्हा ताफ्यात घेतले. त्यानं कॅपिटल्ससाठी २७ सामन्यांत ४४१ धावा केल्या आहेत आणि १५ विकेट्सही घेतल्या. या मधल्या कालावधीत तो पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडूनही खेळला.  

रवी बिश्नोईनं २०२०चा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप गाजवला. त्यानं त्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. पंजाब किंग्सनं त्याला २ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. त्यानं पहिल्या पर्वात १४ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर २०२१मध्ये ९ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या.   

कोणाच्या खात्यात किती शिल्लक( Remaining purse of IPL teams ahead of Mega Auction)

  • पंजाब किंग्स - ७२ कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद - ६ ८ कोटी
  • राजस्थान रॉयल्स -  ६२ कोटी
  •  लखनौ - ६० कोटी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ५७ कोटी
  • अहमदाबाद - ५३ कोटी
  • चेन्नई सुपर किंग्स - ४८ कोटी
  • मुंबई इंडियन्स - ४८ कोटी
  • कोलकाता नाइट रायडर्स - ४८ कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स - ४७.५ कोटी 
टॅग्स :लोकेश राहुलआयपीएल २०२१लखनऊ
Open in App