यंदाच्या आयपीएलमध्ये अडखळत धडपडत असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने आयपीएलमध्ये सोमवारी रात्री झालेल्या लढतीत लखनौ सुपरजायंट्स संघावर थरारक विजय मिळवला. अखेरपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत महेंद्रसिंग धोनीने केलेली ११ चेंडूत २६ धावांची खेळी निर्णायक ठरली. या खेळीसाठी धोनीला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारा धोनी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दरम्यान, अनपेक्षितरीत्या सामनावीराचा सन्मान मिळाल्यानंतर धोनीही अवाक झाला. तसेच त्याची आश्चर्य व्यक्त करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे.
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर धोनीने आश्चर्य व्यक्त केले. या पुरस्कारामुळे तो काहीसा अवाक् झालेला दिसला. तो म्हणाला की, मला वाटलं होतं की हा पुरस्कार मला का देत आहेत. सामनावीराचा मान नूर अहमदला मिळायला हवा होता. त्याने एकही बळी मिळवला नाही, पण त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली होती. त्याने ४ षटकांमध्ये केवळ १३ धावा दिल्या होत्या.
दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात सामनावीराचा मान पटकावत प्रवीण तांबेचा आयपीएलमध्ये सामनावीराचा मान पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम मोडला. धोनीने ४३ वर्षे आणि २८१ दिवस वय असताना सामावीराचा मान पटकावला आहे. तर प्रवीण तांबे याने ४३ वर्षे आणि ६० दिवस वय असताना हा मान पटकावला होता.