मुंबई : अटीतटीच्या झालेल्या लढतीत इंग्लंडने मोक्याच्या वेळी संयमी खेळ करत तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान भारताचा २ बळींनी पराभव केला. भारतीय महिलांनी सामना गमावला असला, तरी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत त्यांनी याआधीच मालिकेवर कब्जा केला होता. विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्यासाठी हा औपचारिकतेचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे २ गुण मिळविण्यात यश आल्याचे समाधान इंग्लंडला मिळाले. भारताने या मालिकेतून ४ गुणांची कमाई करीत आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार मिताली राजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जेमिमा रॉड्रिग्ज अपयशी ठरल्यानंतर स्मृती मानधना (६६) व पूनम राऊत (५६) यांनी १२९ धावांची भागीदारी करीत भारताला सुस्थितीत आणले. मात्र दोघीही एकाच षटकात बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. यामुळे भारताला ५० षटकांत केवळ ८ बाद २०५ धावांचीच मजल मारता आली. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ४८.५ षटकांत ८ बाद २०८ धावा काढून बाजी मारली. मात्र त्यांचाही डाव सुरुवातीला कोलमडला होता. ठराविक अंतराने भारताने धक्के देत इंग्लंडची अवस्था १५व्या षटकात ५ बाद ४९ अशी केली होती. परंतु हीथर नाइट (४७), डॅनियल वॅट (५६) व जॉर्जिया एल्विस (३३*) यांनी संयमी खेळ करत इंग्लंडला विजयी केले. नाइट-वॅट यांनी सहाव्या बळीसाठी ६९ धावांची भागीदारी करीत इंग्लंडला पुनरागमन करून दिले. पूनम यादवने नाइटला बाद करून ही जोडी फोडली. मात्र यानंतर वॅटने शानदार अर्धशतक झळकावून एल्विससह इंग्लंडला विजयी केले. भारताकडून झुलन गोस्वामीने ३, तर शिखा पांडे व पूनम यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी, युवा सलामीवीर जेमिमा डावातील दुसºयाच चेंडूवर त्रिफळाचीत झाल्यानंतर स्मृती मानधना व पूनम यादव यांंनी १२९ धावांची शानदार भागीदारी केली. स्मृतीने ७४ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ६६ धावा, तर पूनमने ९७ चेंडूंत ७ चौकारांसह ५६ धावा फटकावल्या. या दोघींच्या जोरावर भारत मोठी धावसंख्या उभारणार असे दिसत असतानाच कॅथरिन ब्रंटने २९व्या षटकात स्मृती व पूनमला बाद केले आणि भारताच्या डावाला गळती लागली. यानंतर कर्णधार मितालीसह कोणालाही फारशी चमक दाखवता न आल्याने भारताचा डाव मर्यादित धावसंख्येत रोखला गेला. दीप्ती शर्मा (२७) व तळाच्या शिखा पांडे (२६) यांनी चांगली झुंज दिली.
मिताली (७), मोना मेश्राम (०), तानिया भाटिया (०) यांचे अपयश भारताला महागात पडले. कॅथरिन ब्रंटने २८ धावांत ५ बळी घेत भारतीयांचे कंबरडे मोडले. भारताच्या पहिल्या ५ प्रमुख फलंदाजांना ब्रंटनेच माघारी परतावले. (वृत्तसंस्था)