एबी डिव्हिलियर्स लिहितात...
आयपीएलमध्ये यशाचा मंत्र सूर गवसणे हा आहे, हे यापूर्वी अनेकदा म्हटले गेले आहे. एक सामना जिंकल्यानंतर पुढची लढत जिंकली की आव्हान सोपे भासायला लागते. त्यामुळे आनंद मिळायला लागतो आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा विजय मिळवता तर सूर गवसल्याची खात्री पटते.
दुर्दैवाने याच्या विपरीतही तेवढेच खरे आहे. एक-दोन सामने गमावल्यानंतर आव्हान अधिक कठीण भासायला लागते. गोलंदाज आपली लाईन-लेंग्थ मिळवण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसते, तर फलंदाजांचे फटके क्षेत्ररक्षकांकडे जायला लागतात आणि तुम्हाला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागतो... आणि सर्व काही तुमच्या हातातून निसटते. आतापर्यंत आम्ही स्पर्धेत तीन सामने खेळलो. त्यात एक विजय व उर्वरित दोन सामन्यांत पराभूत झालो. आम्ही सूर गवसण्याच्या आपल्या मोहिमेत योग्य दिशेने आगेकूच करण्यासाठी कसून मेहनत घेत आहोत.
रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध गृहमैदानावर स्वीकारावा लागलेला पराभव निराशाजनक आहे. आम्हाला जेथे असायला हवे होते तेथून आम्ही फार लांब नव्हतो. अखेरच्या चार षटकांमध्ये ८२ धावा बहाल केल्या त्याच वेळी सामन्याचे चित्र पाटलले. त्या कालावधीत आम्ही दोन नो-बॉलही टाकले आणि दोन्ही फ्री हिटवर षटकारही लागले. या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात. संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी विशेष खेळी केली. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यासोबत ई-मेलच्या माध्यमातून संपर्कात असतो आणि भारतीय क्रिकेटमध्ये या युवा प्रतिभावान खेळाडूची वाटचाल बघून चांगले वाटते. तो किती लांबचा पल्ला गाठू शकतो? हा प्रश्न उपस्थित होतो. माझ्यावर विश्वास ठेवा, त्याच्यात प्रतिभा ठासून भरली असून त्याला कुठली मर्यादा नाही.
मंगळवारी आम्हाला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे. उभय संघांना विजयाची आवश्यकता आहे. मनदीप सिंग व वॉशिंग्टन सुंदर चांगल्या फॉर्मात आहेत. जर आम्ही योजनाबद्ध खेळ केला तर आम्हाला क्षमतेनुसार कामगिरी करता येईल. एकूण विचार करता यंदा आयपीएलबाबत बरीच चर्चा आहे. येथे दर्जेदार क्रिकेट खेळल्या जात असून मैदानातील माहोलही चांगला आहे. राजस्थान रॉयल्सने वॉर्म-अपच्या वेळी परिधान केलेल्या टी-शर्टप्रमाणे स्पर्धेचा सध्याचा रंग गुलाबी आहे. येथे कुणीतरी जोखीम पत्करली होती, पण त्यांना ते टी-शर्ट चांगले दिसत होते. आम्ही पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हिरवे टी-शर्ट परिधान केले होते. खेळाडूंनी एक दिवसाच्या विश्रांतीचा पूर्ण आनंद घेतला. मी दक्षिण आफ्रिकेत ज्याप्रमाणे पिंक डेची प्रतीक्षा करतो तसेच आरसीबीच्या ग्रीन डेची प्रतीक्षा करीत असतो. सध्या आम्ही मुंबईत असून आम्हाला विजय आवश्यक आहे. (टीसीएम)