कोलंबो : टी-२० तिरंगी मालिकेत अंतिम फेरी गाठण्यास उत्सुक असलेल्या यजमान श्रीलंका व बांगलादेश संघांदरम्यान आज, शुक्रवारी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. उभय संघांदरम्यानच्या लढतीत विजेता संघ १८ मार्च रोजी अंतिम लढतीत भारताविरुद्ध खेळेल.
दोन्ही संघांनी तिरंगी मालिकेत प्रत्येकी एक विजय मिळवला असून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन गुण आहेत. श्रीलंकेने सलामी लढतीत भारताचा पराभव केला होता तर बांगलादेशने २१५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना यजमान संघाविरुद्ध विजय मिळवला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाला तर यजमान संघ सरस नेटरनरेटच्या आधारावर अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. बांगलादेशविरुद्ध अलीकडच्या कालावधीतील लंकेची कामगिरी शानदार आहे. त्यांनी बांगलादेशला कसोटी व टी-२० मालिकेत पराभूत करण्यासह झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या अंतिम फेरीतही त्यांच्याविरुद्ध विजय मिळवला होता.