मुंबई : मनगटाने चेंडू वळवणारे फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीचा सामना करणे कठीण असल्याचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने स्पष्ट केले. आगामी मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार पत्रकारांशी बोलत होता.
विल्यमसन याने सांगितले की,‘दोन्ही गोलंदाज प्रतिभावान आहेत. त्यांच्याकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभवदेखील आहे. याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली दावेदारी केली. हे दोन्ही खेळाडू यशस्वी ठरले आहेत. आम्हाला माहीत आहे की, त्यांना खेळणे हे कडवे आव्हान असेल. आम्ही त्यासाठी तयार आहोत.’ विल्यमसन याने सांगितले की,‘आता चायनामन गोलंदाज फारसे नाहीत, आणि जे आहेत ते यशस्वी ठरले आहेत. त्यांचा सामना करणे कठीण असेल.’’
भारताने या मालिकेसाठी रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जाडेजा यांना वगळल्याबाबत तो म्हणाला,‘ ‘भारतीय संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत.’
,आणि काही काळासाठी त्यांना निश्चितपणे आराम दिला जाणे स्वाभाविक आहे. अनेकदा असे आम्हीदेखील करतो. सर्व खेळाडू प्रत्येक वेळी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू शकत नाही. त्यामुळे असे होते. मात्र टीम इंडिया ही नेहमीच मजबूत आहे.’
(वृत्तसंस्था)
आयसीसीने कसोटी लीग सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हे सकारात्मक पाऊल आहे. ही खरोखरीच एक चांगली चॅम्पियनशिप असेल.त्यामुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व अधिक वाढेल आणि प्रेक्षकांसाठीदेखील हे चांगले आहे.
- केन विल्यमसन
हार्दिक पांड्याचे कौतुक
केन विल्यमसन याने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, पांड्या संघाला स्थिरता देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. गेल्या दोन वर्षात त्याने शानदार खेळ केला आहे. आम्ही त्याला आयपीएलमध्ये पाहिले होते. या आधीच्या मालिकेतदेखील त्याने चांगली गोलंदाजी केली. तो आता फलंदाजीतही योगदान देत आहे. अशा अष्टपैलू खेळाडूला सर्वच संघ आपल्यासोबत ठेवू इच्छितात. तो जलदगती गोलंदाजी करतो, तसेच फलंदाजीत मोठे फटके मारण्यातही तो अग्रेसर आहे.’