Join us

कोलकाताचे वृद्ध जोडपे दहावा विश्वचषक पाहण्यासाठी सज्ज

कोलकाता येथील फुटबॉलचे निस्सीम चाहते पन्नालाल व चैताली चटर्जी हे वृद्ध जोडपे रशियात होणारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाण्याच्या तयारीला लागले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 02:37 IST

Open in App

कोलकाता : कोलकाता येथील फुटबॉलचे निस्सीम चाहते पन्नालाल व चैताली चटर्जी हे वृद्ध जोडपे रशियात होणारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाण्याच्या तयारीला लागले आहे. विशेष म्हणजे, हे जोडपे दहाव्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा आनंद घेणार आहे. १९८२मध्ये जेव्हा स्पेन येथील विश्वचषक स्पर्धा प्रथमच टेलिव्हिजनवरून प्रक्षेपित झाली तेव्हापासून हे जोडपे या स्पर्धेचा प्रत्यक्ष आनंद लुटत आहे.पन्नालाल हे सध्या ८५ वर्षांचे आहेत, तर त्यांची पत्नी ७६ वर्षांची; परंतु ते रशियात होणारा विश्वचषक स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याच्या तयारीला ते लागले आहेत. त्यांची ही दहावी विश्वचषक स्पर्धा असेल आणि कदाचित ते शेवटच्या वेळी स्टेडियममध्ये जाऊन फुटबॉल विश्वचषकाचा आनंद घेतील.पन्नालाल म्हणाले,‘‘मी २०२२ मध्ये जवळपास ९० वर्षांचा होईन आणि आमची पुढील विश्वचषकासाठी कतार येथे जाण्याची शक्यता खूप कमी आहे.’’ प्रत्येक विश्वचषक पाहण्यास जाण्याच्या निर्णयामुळे या जोडप्याला अनेक प्रकारे त्याग करावा लागला आहे. त्यात त्यांच्या आवडत्या भोजनाचा समावेश आहे. हे जोडपे नेहमीच विश्वचषकासाठी पैसे जमवते आणि त्यात कोणताही समझोता करीत नाही. कस्टम क्लबच्या ७ माजी फुटबॉलपटूंच्या समूहासोबत हे जोडपे १४ जूनला रशियाला रवाना होईल आणि जर त्यांना बादफेरीची तिकिटे मिळाली नाहीत, तर ते २८ जूनला मायदेशी परतणार आहेत. त्यांनी रशियाचा वाणिज्य दूतावास आणि फिफा आयोजन समितीला जास्त तिकिटे देण्याचा आग्रह केला आहे.फिफाच्या स्थानिक आयोजन समितीने गेल्या वर्षी अंडर १७ वर्ल्डकपदरम्यान त्यांना फायनलसह प्रत्येक सामन्यात विशेष पाहुणे म्हणून वागणूक दिली होती. या जोडप्याचे स्पर्धेसाठी ५ लाख रुपये बजेट आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही या वेळेस फक्त ३ तिकिटे खरेदी करू शकलो. आम्ही फिफाला जास्त तिकिटांसाठी आग्रह केला आहे; परंतु त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही.’’

टॅग्स :आयसीसी विश्वकप २०१९