माझ्या आवडीचे दोन संघ एलिमिनेटरमध्ये समोरा-समोर राहणार असून एकाच संघाला आगेकूच करता येईल. ही लढाई नसून हा खेळ आहे. त्यामुळे केकेआर आणि राजस्थान हे संघ निकालाची तमा न बाळगता आयपीएलमध्ये अभिमानास्पद कामगिरी केल्यामुळे समाधानी असतील.
केकेआर संघासाठी यावेळी एक बाब अडचणीची ठरली. त्याचे अनेक विदेशी खेळाडू फिट नव्हते. मिशेल स्टार्कच्या रूपाने त्यांनी मॅचविनर खेळाडू गमावला. पण, या संघाने शानदार खेळ केला. संघाचे नेतृत्व सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूकडे सोपविले गेले. संघातर्फे तीन विदेशी खेळाडू लीन, नरेन व रसेल यांनी शानदार कामगिरी केली. कार्तिक सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात आहे, तर रॉबिन उथप्पाकडून अद्याप सर्वोत्तम खेळीची प्रतीक्षा आहे. संघातर्फे गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावत असून माझ्या मते हा संघ दावेदार राहील. या संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
राजस्थानकडे शानदार संघ आहे. त्यांनी लिलावामध्ये चांगल्या खेळाडूंची निवड केली, पण अडचणीची बाब म्हणजे त्यांच्याकडे चांगले राखीव खेळाडू नाहीत. स्टीव्ह स्मिथला गमावणे संघासाठी मोठा धक्का होता, पण स्टोक्स, रहाणे, उनाडकट व डीआर्ची शॉर्ट यांच्या निराशाजनक फॉर्ममुळे संघाच्या अडचणींमध्ये भर पडली. पण, संघाकडून चमकदार कामगिरीसाठी एक प्रेरणादायी खेळाडू पुरेसा ठरतो. बटलरला आघाडीच्या फळीत खेळविणे आणि आर्चरला संधी देण्याचा निर्णय राजस्थानसाठी लाभदायक ठरला. बटलरने त्यांच्यातर्फे अनेक सामन्यांत शानदार कामगिरी केली, पण संघासाठी सर्वात महत्त्वाची लढत आरसीबीला बाहेरचा मार्ग दाखविणारी ठरली. रॉयल्सचे खरे ‘हिरो’ श्रेयस गोपाल व के. गौतम यांच्यासारखे खेळाडू आहेत. संघाने उपलब्ध पर्यायांचा सर्वोत्तम वापर केला. जवळजवळ ६० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत कोलकातामध्ये खेळणे केकेआर संघासाठी लाभदायक ठरू शकते, पण ही एक नॉकआऊट लढत असून त्यात काहीच सोपे नसेल.
(टीसीएम)