Join us  

कोहलीचे विक्रमी द्विशतक, भारताची दमदार मजल; श्रीलंका ३ बाद १३१

विराट कोहलीच्या विक्रमी द्विशतकानंतर भारताने तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी दुस-या दिवशी पहिला डाव ७ बाद ५३६ धावसंख्येवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेची ३ बाद १३१ अशी अवस्था करीत वर्चस्व कायम राखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 1:59 AM

Open in App

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या विक्रमी द्विशतकानंतर भारताने तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी दुस-या दिवशी पहिला डाव ७ बाद ५३६ धावसंख्येवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेची ३ बाद १३१ अशी अवस्था करीत वर्चस्व कायम राखले. प्रदूषणामुळे रविवारी उपाहारानंतर दोनदा खेळात व्यत्यय निर्माण झाला. श्रीलंकेच्या खेळाडूंनी चिंता व्यक्त केल्यामुळे सामना सुरू ठेवण्यासाठी कोहलीला डाव घोषित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.कोहलीने आपल्या कारकिर्दीतील व कोटला मैदानावरील सर्वोत्तम खेळी करताना २८७ चेंडूंमध्ये २५ चौकारांच्या मदतीने २४३ धावांची खेळी केली. त्याने रोहित शर्माच्या (६५) साथीने पाचव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. कोहली या खेळीदरम्यान कसोटी इतिहासात सर्वाधिक सहा द्विशतकी खेळी करणारा पहिला कर्णधार व सलग दोन द्विशतके ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याचसोबत यंदाच्या मोसमात एक हजार धावा फटकावणारा चौथा फलंदाज ठरला. श्रीलंकेतर्फे चायनामन गोलंदाज लक्षण संदाकन सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १६७ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले. वेगवान गोलंदाज लाहिरू गमागेने ९५ धावांत दोन, तर फिरकीपटू दिलरुवान परेराने १४५ धावांत एक बळी घेतला.प्रत्युत्तरात खेळताना मोहम्मद शमी (१-३०), ईशांत शर्मा (१-४४) आणि रवींद्र जडेजा (१-२४) यांच्या अचूक माºयापुढे श्रीलंकेची ३ बाद ७५ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज (नाबाद ५७) व कर्णधार दिनेश चंडीमल (नाबाद २५) यांनी चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची अभेद्य भागीदारी करीत डाव सावरला. अंधुक प्रकाशामुळे आजचा खेळ निर्धारित वेळेपूर्वीच थांबविण्यात आला. श्रीलंका संघ अद्याप ४०५ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. सलामीवीर सदिरा समरविक्रम याला शनिवारी क्षेत्ररक्षण करताना हेल्मेटवर चेंडू आदळल्यामुळे दुखापत झाली होती. त्यामुळे आज परेराने दिमुथ करुणारत्नेच्या साथीने डावाची सुरुवात केली. करुणारत्नेला (०) शमीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर यष्टिरक्षक साहाकडे झेल देण्यास भाग पाडले, तर धनंजय डिसिल्व्हाला (१) ईशांतने पायचित केले. चहापानानंतर पहिल्याच षटकात शमीच्या गोलंदाजीवर शिखर धवनने दुस-या स्लिपमध्ये परेराचा झेल सोडला. त्या वेळी तो १६ धावांवर खेळत होता. कर्णधार कोहलीने त्यानंतर ईशांतच्या गोलंदाजीवर वैयक्तिक ६ धावांवर खेळणाºया अँजेलो मॅथ्यूजचा झेल सोडला. जडेजाने परेराला पायचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. मैदानावरील पंचांनी जडेजाचे अपील फेटाळले होते, पण डीआरएसचा अवलंब केल्यानंतर निर्णय गोलंदाजाच्या बाजूने लागला. परेराने ५४ चेंडूंना सामोरे जाताना ४२ धावा केल्या. (वृत्तसंस्था)प्रदूषणामुळे दोनदा खेळात व्यत्यय श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालून मैदानातभारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात प्रदूषणामुळे वातावरण खराब असल्यामुळे उपाहारानंतर दोनदा खेळ थांबविण्याची लाजिरवाणी स्थिती निर्माण झाली. श्रीलंकेचे अनेक खेळाडू उपाहारानंतर मास्क घालून मैदानात उतरले. डावाच्या १२३ व्या षटकात वायू प्रदूषणामुळे जवळजवळ १७ मिनिटे खेळ थांबवावा लागला. मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी डॉक्टरसोबत चर्चा केल्यानंतर पुन्हा खेळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.विरोध करणे खेळाडूंचे काम नाही : भरत अरुणप्रदूषणाच्या कारणास्तव उपाहार व चहापानाच्या कालावधीत वारंवार खेळ थांबविण्याच्या श्रीलंकन खेळाडूंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी विरोध करणे खेळाडूंचे काम नसल्याचे सांगत परिस्थिती उभय संघांसाठी समान होती, असे म्हटले आहे. दुस-या दिवसाचा खेळ थांबल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अरुण म्हणाले, ‘माझ्या मते विराट कोहलीने जवळजवळ २ दिवस फलंदाजी केली. त्याला मास्कची गरज भासली नाही. आम्ही काय करायला हवे, यावर आमचे लक्ष होते. परिस्थिती उभय संघांसाठी समान होती. त्यामुळे आम्ही याबाबत त्रस्त नव्हतो.’सामना सुरू ठेवण्याबाबत प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या संभाव्य विरोधाबाबत बोलताना अरुण म्हणाले, ‘हे सामनाधिकाºयाचे काम आहे. हे खेळाडूंचे काम नाही. अनावश्यक पद्धतीने खेळ थांबविण्यात आला त्या वेळी आम्ही खेळण्यास इच्छुक होतो. आमचे लक्ष चांगली कामगिरी करीत विजय मिळवण्यावर केंद्रित झाले आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सामना सुरू ठेवण्यास इच्छुक होते.’सामना सुरू ठेवण्यासाठी भारताला डाव घोषित करावा लागला का, याबाबत बोलताना अरुण म्हणाले, तसे काही नाही. आमचे लक्ष ५५० धावसंख्येवर होते. आम्ही त्याच्यासमीप होतो त्यामुळे डाव घोषित केला.’ श्रीलंकेने दावा केला, की गमागे व लकमल यांच्याव्यतिरिक्त धनंजय डिसिव्हा यालाही उलट्यांचा त्रास होत होता.यापूर्वी अशा परिस्थितीला कधीच सामोरे जावे लागले नाही : पोथासभारताविरुद्ध तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात प्रदूषणाचा स्तर वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त करताना श्रीलंकेचे प्रशिक्षक निक पोथास यांनी त्यांच्या खेळाडूंना यापूर्वी अशा स्थितीला कधीच सामोरे जावे लागले नसल्याचे स्पष्ट केले. आमच्या काही खेळाडूंना याचा बराच त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले. दुसºया दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पोथास म्हणाले, ‘दिल्लीमध्ये प्रदूषण अधिक आहे, हे आता लपलेले नाही. आजच्या खेळादरम्यान एक वेळ याचा स्तर अधिक वाढला होता. आमचे खेळाडू मैदानातून उलट्या करीत बाहेर पडले. ड्रेसिंग रूममध्ये आॅक्सिजनचा स्तर कमी झाला होता.’अशा अडचणीमध्ये खेळणे खेळाडूंसाठी सर्वसामान्य बाब नाही. आमच्यासाठी ही एकदम नवी समस्या होती. सामनाधिकारी, रेफरी व सर्वांनी स्थिती बरोबर हाताळली. नवी अडचण उद््भवली म्हणजे निर्णय घेणे सोपे नसते. आमच्या खेळाडूंच्या हितासाठी आम्ही खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला.’विक्रमवीर विराट...कोहलीने कारकिर्दीत सहाव्यांदा द्विशतकी खेळी केली. या सर्व खेळी त्याने कर्णधार असताना केल्या आहेत. त्याने विंडीजचामाजी कर्णधार महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडला. लाराने कर्णधारपदी असताना पाच द्विशतकी खेळी केल्या होत्या. कोहलीने भारतातर्फे सर्वाधिक द्विशतके झळकावणारे फलंदाज सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

नागपूर कसोटीत २१३ धावांची खेळी करीत सलग दोन द्विशतके ठोकणारा कोहली केवळ दुसरा भारतीय व जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारतातर्फे विनोद कांबळीने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध मुंबई येथे २२४ व झिम्बाब्वेविरुद्ध दिल्लीमध्ये २२७ धावांची खेळी करीत हा विक्रम नोंदवला होता. कोहलीने आजच्या द्विशतकी खेळीदरम्यान न्यूझीलंडच्या बर्ट सटक्लिफने फिरोजशाह कोटलावर केलेल्या ६२ वर्षांपूर्वीचा नाबाद २३० धावांचा, तसेच सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडला. कोहलीने २३४ धावा घेत यंदाच्या मोसमात कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी यंदा दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गर, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने व भारताच्या चेतेश्वर पुजारा यांनी हा पराक्रम केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२ द्विशतके ठोकण्याचा विक्रम आॅस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमन यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेचा कुमार संगकारा (११), ब्रायन लारा (९) आणि इंग्लंडचे वॉली हॅमंड (७) आणि श्रीलंकेचा माहेला जयवर्धने (७) यांनी कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीपेक्षा अधिक द्विशतकी खेळी केल्या आहेत.

 

 

धावफलकभारत पहिला डाव :- मुरली विजय यष्टिचित डिकवेला गो. संदाकन १५५, शिखर धवन झे. लकमल गो. परेरा २३, चेतेश्वर पुजारा झे. समरविक्रम गो. गमागे २३, विराट कोहली पायचित गो. संदाकन २४३, अजिंक्य रहाणे यष्टिचित डिकवेला गो. संदाकन ०१, रोहित शर्मा झे. डिकवेला गो. संदाकन ६५, रविचंद्रन आश्विन झे. परेरा गो. गमागे ०४, वृद्धिमान साहा नाबाद ०९, रवींद्र जडेजा नाबाद ०५. अवांतर (०८). एकूण : १२७.५ षटकांत ७ बाद ५३६ (डाव घोषित). बाद क्रम : १-४२, २-७८, ३-३६१, ४-३६५, ५-५००, ६-५१९, ७-५२३. गोलंदाजी : लकमल २१.२-२-८०-०, गमागे २५.३-७-९५-२, परेरा ३१.१-०-१४५-१, संदाकन ३३.५-१-१६७-४, डिसिल्व्हा १६-०-४८-०.श्रीलंका पहिला डाव :- दिमुथ करुणारत्ने झे. साहा गो. शमी ००, दिलरुवान परेरा पायचित गो. जडेजा ४२, धनंजय डिसिल्व्हा पायचित गो. ईशांत ०१, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे ५७, दिनेश चंडीमल खेळत आहे २५. अवांतर (६). एकूण : ४४.३ षटकांत ३ बाद १३१. बाद क्रम : १-०, २-१४-, ३-७५. गोलंदाजी : शमी ११-३-३०-१, ईशांत १०-४-४४-१, जडेजा १४.३-६-२४-१, आश्विन ९-३-२८-०.

टॅग्स :क्रिकेटविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघश्रीलंका