लंडन : भारतीय कर्णधार विराट कोहली व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा विस्डेनच्या दशकातील सर्वोत्तम टी२० आंतरराष्ट्रीय संघात समावेश आहे. त्याचवेळी दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला या संघात स्थान मिळू शकले नाही.
आॅस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार अॅरोन फिंचला संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. संघात दोन अन्य आॅस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉटसन व ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचे जोस बटलर व डेव्हिड विली, अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी व राशिद खान, न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो व श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यांचाही समावेश आहे.
विस्डेनने कोहलीबाबत लिहिले की, ‘कोहलीचा स्थानिक टी२० रेकॉर्ड चढ-उतार राहिला असला तरी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे म्हणता येणार नाही. त्याची सरासरी ५३ ची असून ही दशकातील सर्वोत्तम आहे. कामगिरीत सातत्य असल्याने त्याच्या स्ट्राइक रेटबाबत अधिक विचार करण्याची गरज नाही.’ (वृत्तसंस्था)
कोहलीला विस्डेनच्या दशकातील टी२० संघात फलंदाजांमध्ये स्थान मिळाले तर गोलंदाजांमध्ये बुमराह शानदार ‘इकॉनॉमी रेट’ व डेथ ओव्हर्समधील शानदार गोलंदाजीमुळे अंतिम संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.
कोहली चांगल्या स्ट्राईक रेटने धावा फटकावण्यास सक्षम असल्याचे सांगत विस्डेनने म्हटले की, ‘वेगवान व फिरकी गोलंदाजीविरुद्ध दमदार व वेगाने धावा पळण्याची क्षमता लक्षात घेता तो तिसऱ्या क्रमांकासाठी आदर्श खेळाडू आहे.’
‘सुरुवातीला गडी बाद झाल्यानंतर तो भेदक माºयाचा यशस्वी सामना करीत डाव सावरण्यास सक्षम असून तो चांगल्या सुरुवातीनंतर वेगाने धावाही फटकावू शकतो. सलामीली मोठी भागीदारी झाल्यानंतर कोहली या संघात खालच्या क्रमांकावर येईल,’ असेही विस्डेनने लिहिले.
कोहलीला याआधी विस्डेनने दशकातील पाच खेळाडूंमध्ये स्थान दिले होते. त्यात स्टीव्ह स्मिथ, डेल स्टेन, एबी डिव्हिलियर्स व एलिस पॅरी होते.
विस्डेनने लिहिले की,‘बुमराहचा ओव्हरआॅल इकॉनॉमी रेट ६.७१
असा आहे. जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये डेल स्टेननंतर हा दुसरा सर्वोत्तम इकॉनॉमी रेट आहे. ही आकडेवारी अधिक प्रभावी भासेल ज्यावेळी तुम्हाला बुमराहने जास्तीत जास्त गोलंदाजी डेथ ओव्हर्समध्ये केल्याचे निदर्शनास येईल. डेथ ओव्हर्समध्ये त्याने ७.२७ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. जगात ही सातवी सर्वोत्तम आणि वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आकडेवारी आहे. बुमराह आपल्या संघासाठी तीन षटके डेथ ओव्हर्समध्ये करू शकतो.’ त्याचवेळी, भारताचा २००७ च्या टी२० विश्वचषक विजेता कर्णधार धोनी या आॅलस्टार संघात स्थान मिळवू न शकलेला प्रमुख खेळाडू आहे.
विस्डेन दशकातील
टी२० संघ : अॅरोन फिंच (कर्णधार), कोलिन मुन्रो, विराट कोहली, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, जोस बटलर, मोहम्मद नबी, डेव्हिड विली, राशिद खान, जसप्रीत
बुमराह आणि लसिथ मलिंगा.