बर्मिंघम : सध्या सुरू असलेल्या मालिकेत यजमान संघाचे गोलंदाज उर्वरित भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरले तर विराट कोहलीवर दडपण आणता येईल, असे मत इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस यांनी व्यक्त केले आहे.
बेलिस म्हणाले,‘विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही, पण तो नक्कीच त्याच्या आसपास आहे. पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या व दुसऱ्या डावात शानदार कामगिरी केली. आम्ही भारतीय संघातील उर्वरित फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरलो तर त्याच्यावर नक्कीच दडपण निर्माण करता येईल.‘
बेलिस पुढे म्हणाले, ‘पहिल्या लढतीनंतर आमच्यात काहीच फरक पडलेला नाही. आमच्या संघातील काही खेळाडूंचे स्थान पक्के नाही. त्यामुळे जो रुट व जॉनी बेयरस्टो यांच्यासारख्या खेळाडूंवर अतिरिक्त दडपण येते.’ तसेच, ‘पहिल्या डावात चारही डावांमध्ये विकेट पडल्या आणि सर्व फलंदाज संघर्ष करीत असल्याचे दिसले. कोहलीलाही सुरुवातीला चांगला खेळ करता आला नाही. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी कठीण होती,’ असेही बेलिस म्हणाले.