Join us  

KKR vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सचे वादळ अन् वॉशिंग्टन, युजवेंद्रच्या फिरकीसमोर KKR हतबल

KKR vs RCB Latest News :  RCBच्या वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी KKRच्या फलंदाजांना तालावर नाचवले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 12, 2020 10:59 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या प्ले ऑफच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याच्या निर्धारानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) शारजाह स्टेडियमवर उतरले होते. पण, चाहत्यांना अपेक्षित असलेला चौकार-षटकारांचा पाऊस पडला नाही. एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांनी अखेरच्या षटकांत शतकी भागीदारी करून RCBला मोठा पल्ला गाठून दिला. त्यानंतर RCBच्या वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी KKRच्या फलंदाजांना तालावर नाचवले. निम्मा संघ ६४ धावांवर माघारी परतल्यानंतर आंद्रे रसेलही KKRचा पराभव टाळू शकला नाही. KKRच्या फलंदाजांना मॅच विनिंग भागीदारीच RCBच्या गोलंदाजांनी करू दिली नाही. 

नाणेफेक जिंकून RCBनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडीक्कल आणि आरोन फिंच यांनी RCBला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. ८व्या षटकात आंद्रे रसेलनं ( Andre Russell) KKRला पहिले यश मिळवून दिले. त्यानं पडीक्कलचा त्रिफळा उडवला. पडीक्कल २३ चेंडूंत ३२ धावांवर माघारी परतला.  फिंचला KKRच्या प्रसिध कृष्णानं माघारी पाठवले. फिंच ३७ चेंडूंत ४७ धावांवर त्रिफळाचीत झाला. KKRच्या गोलंदाजांनी RCBच्या धावगतीला वेसण घातले होते. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या शारजाहच्या खेळपट्टीवर वरूण चक्रवर्थीनं चार षटकांत २५ धावा दिल्या.      १६व्या षटकापासून विराट आणि एबी डिव्हिलियर्स यांनी गिअर बदलला. एबीनं १६व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले आणि १८ धावा चोपल्या. १७व्या षटकात पॅट कमिन्स गोलंदाजीला आला, पण एबीनं त्यालाही सोडलं नाही. त्या षटकात १९ धावांचा पाऊस पाडला. एबीनं २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचं हे ३६वे अर्धशतक ठरलं. १८व्या षटकात एबीनं १८ धावा चोपल्या. १९वे षटक टाकणाऱ्या कृष्णानं RCBचा धावांचा वेग किंचित कमी करत १२ धावा दिल्या. रसेलच्या अखेरच्या षटकात १७ धावा करून RCBनं २ बाद १९४ धावांचे आव्हान उभे केले. एबीनं ३३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७३, तर विराटनं नाबाद ३३ धावा केल्या.  प्रत्युत्तरात सर्वांचे लक्ष KKRकडून पदार्पण करणाऱ्या टॉम बँटनकडे होते, पण तो ८ धावांवर नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्य वॉशिंग्टन सुंदरनं KKRला दुसरा धक्का दिला. त्यानं नितिश राणाचा ( ९) त्रिफळा उडवला. सेट झालेला शुबमन गिलही धावबाद झाला. गिलनं २५ चेंडूंत ३४ धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिकला ( १) युझवेंद्र चहलनं त्रिफळाचीत केलं. पुढच्याच षटकात सुंदरनं KKRच्या इयॉन मॉर्गनला ( ८) बाद केले. KKRचा निम्मा संघ ६४ धावांवर तंबूत गेला होता. सुंदरनं ४ षटकांत २० धावा देत २ विकेट्स घेतल्या.  आंद्रे रसेलनं १० चेंडूंत १६ धावा करून धावांचा आणि चेंडूंचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु इसुरू उडानानं त्याला बाद केले. रसेलच्या विकेटसह KKRच्या विजयाच्या आशाही मावळल्या. KKRला कसेबसे २० षटकांत ९  बाद ११२ धावांपर्यंत मजल मारता आली. RCBनं हा सामना ८२  धावांनी जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आगेकूच केली. चहलच्या ४ षटकांत KKRला १२ धावाच करता आल्या आणि त्यांनी एक विकेटही गमावली. 

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएबी डिव्हिलियर्सविराट कोहलीअ‍ॅरॉन फिंचकोलकाता नाईट रायडर्स