नवी दिल्ली : गेल्या सहापैकी पाच सामने गमविणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सपुढे विजयी पथावर पोहोचण्यासाठी शुक्रवारी बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सला नमविण्याचे आव्हान असेल.
आतापर्यंतच्या सामन्यात दिल्लीचे फलंदाज अपयशी ठरले, शिवाय गोलंदाजीची धार देखील बोथट जाणवली. त्यांना एकमेव विजय मिळविता आला तो मुंबई इंडियन्सविरुद्ध. पाच सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागल्याने त्रस्त झालेल्या गौतम गंभीरने संघाचे नेतृत्व सोडून दिले. खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारून गंभीरने वेतन न घेण्याचा देखील निर्णय घेतला. त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपविण्यात आल्याने नव्या कर्णधारामुळे यजमान संघाचे भाग्य फळफळेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
गंभीरचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याने सहा सामन्यात १७ च्या सरासरीने ८५ धावा केल्या. ऋषभ पंतने सहा सामन्यात २२७ आणि अय्यरने १५१ धावा केल्या आहेत. संघाचे विदेशी स्टार जासन रे, ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस मॉरिस यांनीही घोर निराशा केली.
गोलंदाजीत लियाम प्लंकेट याने पहिल्या सामन्यात तीन गडी बाद केले तर ट्रेंट बोल्टच्या वाट्याला सहा सामन्यात नऊ बळी आले. लेग स्पिनर राहुल तेवातिया याने सहा सामन्यात सहा तर मोहम्मद शमी याने चार सामन्यात तीन गडी बाद केले आहेत. केकेआरच्या फलंदाजांपुढे दिल्लीचे गोलंदाज कसा मारा करतात यावर विजयाचे समीकरण ठरणार आहे.
दुसरीकडे सुनील नरेन, कुलदीप यादव व पीयूष चावला हे फिरकीपटूंचे त्रिकूट केकेआरसाठी प्रभावी ठरले असून मिचेल जॉन्सननेही सरस मारा केला. कर्णधार दिनेश कार्तिकने सहा सामन्यात १९४ तर ख्रिस लीनने १८१ धावा ठोकल्या. शाहरुख खानचा हा संघ मागच्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमांच्या आधारे पंजाबकडून पराभूत झाला. पण त्याआधी सलग दोन सामने जिंकल्याने या संघाचे सहा सामन्यात सहा गुणांसह चौथे स्थान आहे. (वृत्तसंस्था)