Join us  

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजला रोखणं अवघड होणार; पोलार्ड, ब्राव्हो वर्ल्ड कप खेळणार? 

30 मे पासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या कुंभमेळ्यासाठी विंडीजने त्यांच्या 10 राखीव सदस्यांची नावं रविवारी जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 10:15 AM

Open in App

जमैका, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज हा असा एक संघ आहे की जो कोणत्याही बलाढ्य संघाला नमवण्याची धमक राखतो. फक्त त्यांचे सर्व हुकुमी एक्के चालायला हवेत. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली विंडीजचा संघ वर्ल्ड कप विजयाच्या निर्धाराने इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. 30 मे पासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या कुंभमेळ्यासाठी विंडीजने त्यांच्या 10 राखीव सदस्यांची नावं रविवारी जाहीर केली. आश्चर्याची बाब म्हणजे गेली दोनेक वर्ष राष्ट्रीय वन डे संघातून बाहेर असलेल्या किरोन पॉलार्ड आणि ड्वेन ब्राव्हा यांचे नाव त्या राखीव खेळाडूंमध्ये आहे. त्यांच्याशिवाय तिरंगी मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सुनील अँब्रीसलाही स्थान देण्यात आले आहे. याआधी आलेल्या वृत्तानुसार 2016नंतर राष्ट्रीय संघाकडून एकही वन डे सामना न खेळलेला पोलार्डला विंडीजच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वेस्ट इंडिजने वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात पोलार्डला स्थान देण्यात आलेले नाही. पण, अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या 32 वर्षीय पोलार्डची संघात एन्ट्री होऊ शकते. गार्डीयनने दिलेल्या वृत्तानुसार विंडीज संघाच्या निवड समितीचे प्रमुख रॉबर्ड हायनेस यांनी दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी पोलार्डच्या नावाची शिफारस केली आहे. पोलार्डच्या समावेशामुळे विंडीजची ताकद वाढणार आहे. आंद्रे रसेल, एव्हीन लुईस, ख्रिस गेल आणि शाय होप यांना पोलार्ड व ब्राव्होची साथ मिळाल्यास विंडीजला रोखणं कठीण होणार आहे.  

राखीव खेळाडूंमध्ये पोलार्ड व ब्राव्हो हे तगडे उमेदवार आहेत, पण अँब्रीसने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. अँब्रीसने नुकत्याच पार पडलेल्या तिरंगी मालिकेत चार सामन्यांत 92.67च्या सरासरीनं 278 धावा चोपल्या आहेत. त्याचीच पोचपावती म्हणून त्याला राखीव खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली.  23 मे पर्यंत अंतिम संघ पाठवायचा आहे आणि दुखापतग्रस्त खेळाडू तंदुरुस्त न झाल्यास पोलार्डचा मार्ग मोकळा होईल. वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पहिला सामना 31 मेला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पोलार्डने 101 वन डे सामन्यांत 2289 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतकं व 9 अर्धशतकं आहेत. शिवाय त्याने 50 विकेट्सही घेतल्या आहेत.  

वेस्ट इंडिजचा संघ सॉउदम्प्टनला दाखल झाला असून चार दिवसांच्या सराव शिबीरानंतर विंडीज ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याशी सराव सामना खेळणार आहे.

वेस्ट इंडिज खेळाडू: जेसन होल्डर (कप्तान), आंद्रे रसेल, एश्ले नर्स, कार्लोस ब्रॅथवेट, क्रिस गेल, डॅरेन ब्राव्हो, एविन लुइस, फॅबियन एलेन, केमार रोच, निकोलस पूरन, ओशाने थॉमस, शाई होप, शॅनन गॅब्रियल, शेल्डन कोटरेल, शिमरॉन हेटमायर.

राखीव खेळाडू - सुनील अँब्रीस, ड्वेन ब्राव्हो, जोह कॅम्बेल, जोनाथन कार्टर, रोस्टन चेस, शेन डोवरीच, किमो पॉल, खॅरी पिएरे, रेयमन रैफर, किरॉन पोलार्ड.  

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९वेस्ट इंडिजड्वेन ब्राव्हो