Join us  

खतम...टाटा...बाय-बाय, राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर करत सेहवागनं केलं इंग्लंडच्या खेळाडूंना ट्रोल

IND vs ENG Day-Night Test: इंग्लंडच्या फलंदाजीवर राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर करत केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:10 PM

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडचा संघ अवघ्या ११२ धावांत झाला बादअहमदाबादमध्ये रंगतोय सामना

 फिरकीपटू अक्षर पटेल याने केलेल्या भेदक फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांमध्ये संपुष्टात आणताना यजमान भारताने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी आपली पकड घट्ट केली. कारकीर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलने आपल्या चमकदार फिरकीच्या जोरावर इंग्लंडला बॅकफूटवर आणले. नाणेफेक जिंकून इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी घेतली. यावेळी, भारतीयांवर नाणेफेक गमावल्याचे दडपणही होते. परंतु, शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांतने तिसऱ्याच षटकात भारताला पहिले यश मिळवून देताना सलामीवीर डॉम सिब्ले (०) याला भोपळाही फोडू दिला नाही. यानंतर ठराविक अंतराने इंग्लंडला धक्के बसत गेले. दरम्याान, इंग्लंडच्या या फलंदाजीवरून भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या रॅलीतला एक व्हिडीओ शेअर करत ट्रोल केलं.

सेहवागनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात राहुल गांधी "खतम... टाटा... बायबाब... गया" असं म्हणताना दिसत आहेत. यासोबत विरेंद्र सेहवागनं कॅप्शन देत इंग्लंडचे फलंदाज मैदानावर आल्यानंतर असे म्हटले आहे. 

सामन्यात इंग्लंडची दाणादाण उडवली ती पटेलने. त्याने झॅक क्रॉवली, जॉनी बेयरस्टॉ, बेन स्टोक्स, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. विशेष म्हणजे आपल्या पहिल्याच चेंडूवर पटेलने धोकादायक बेयरस्टॉला पायचीत पकडत इंग्लंडवर दडपण टाकले. यावेळी, बेयरस्टॉने डीआरएसही घेतला, मात्र निर्णय भारताच्या बाजूने लागल्याने इंग्लंडने एक रिव्ह्यूही गमावला.एकीकडे पटेलच्या फिरकीपुढे भंबेरी उडत असताना दुसरीकडे, अनुभवी रविचंद्रन अश्विननेही इंग्लिश साहेबांना चांगलेच नाचवले. अश्विनने कर्णधार जो रुट, ओली पोप आणि जॅक लीच यांना बाद करून इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर नेले. त्याने २६ धावांत ३ मोहरे टिपले. दोन्ही बाजूंनी फिरकी माऱ्याचे दडपण इंग्लंडला न पेलविल्याने त्यांची ९८ धावांत ८ बाद अशी केविलवाणी अवस्था झाली होती. युवा सलामीवीर क्रॉवलीने एकाकी झुंज देताना ८४ चेंडूंत १० चौकारांसह ५३ धावांची लढत दिली. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून योग्य साथ मिळाली नाही. यानंतर   भारताने डीनर ब्रेकपर्यंत बिनबाद ५ धावा अशी सुरुवात करत कोणताही धोका पत्करला नाही. भारतीयांनी अत्यंत सावध पवित्रा घेत पहिल्या १० षटकांत केवळ १४ धावा केल्या.   त्यानंतर मात्र शुभमान गिल  ११ धावांवर तर चेतेश्वर पुजारा भोपळा न फोडताच माघारी फिरला. कर्णधार विराट कोहली दिवसाचा खेळ संपता संपता २७ धावा काढून परतला. इंग्लंडकडून जॅक लीचने दोन तर जोफ्रा आर्चर याने एक गडी बाद केला.

टॅग्स :विरेंद्र सेहवागराहुल गांधीभारत विरुद्ध इंग्लंड