शारजा : पावसाच्या व्यत्यय आलेल्या सामन्यात केरळा किंग्ज संघाने तुफानी फटकेबाजी करताना टीम श्रीलंकाचा ८ विकेट्सने धुव्वा उडवत टी१० लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारीत षटकात ३ बाद ११२ धावांची मजल मारली. पावसाच्या व्यत्ययामुळे केरळा संघाला ८ षटकात ९१ धावांचे लक्ष्य मिळाले. हे आव्हान केरळाने २ फलंदाजांच्या मोबदल्यात ११ चेंडू राखून सहजपणे पार केले. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ प्रिंट पार्टनर आहे.
ऐतिहासिक शारजा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सलामीवीर चॅडविक वॉल्टन आणि मधल्या फळीतला केरॉन पोलार्ड या धडाकेबाज वेस्ट इंडियन फलंदाजांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर केरळाने बाजी मारली. पॉल स्टिरलिंग (०) आणि इआॅन मॉर्गन (१) अपयशी ठरल्यानंतर वॉल्टन - पोलार्ड यांनी सर्व सूत्रे आपल्याकडे घेत अखेरपर्यंत श्रीलंका संघाची धुलाई केली आणि संघाचा विजय साकारला. वॉल्टनने २१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४७ धावा काढल्या. दुसरीकडे, पोलार्डने १२ चेंडूत ६ उत्तुंग षटकार खेचताना नाबाद ४० धावांचा तडाखा दिला. या दोघांच्या धमाकेदार खेळी पुढे लंकेच्या कोणत्याही गोलंदाजाचा निभाव लागला नाही.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात संथ झाली. त्यांनी डावात तब्बल २४ चेंडूत निर्धाव खेळले. परंतु, सध्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आलेल्या दिनेश चंडिमल (३८*), भानुका राजपक्ष (२६) आणि रमिथ रामबुकवेला (२०*) यांनी मोक्याच्यावेळी केलेल्या फटकेबाजीमुळे श्रीलंका संघाला समाधानकारक मजल मारता आली. परंतु, वॉल्टन - पोलार्ड यांच्या धडाक्यापुढे त्यांचा पराभव झाला.
या सामन्यादरम्यान आलेल्या पावसामुळे क्रिकेटचाहत्यांचा नक्कीच हिरमोड झाला. परंतु, वॉल्टर - पोलार्ड यांची चौकार - षटकारांचा वर्षाव करत स्टेडियममध्ये पुन्हा जोश निर्माण केला. यानंतरही पावसाने हजेरी लावली, मात्र तरीही सुमारे १२ हजार प्रेक्षकांची उपस्थिती लाभलेल्या शारजा स्टेडियमचा उत्साह कमी झाला नाही. स्पर्धेत केरळा संघाव्यतिरीक्त पख्तून्स, पंजाब लेजंड्स व मराठा अरेबियन्स या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.