Join us  

कोहली-शास्त्री यांच्या राजकारणाचा 'करुण' बळी

या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात करुणने नाबाद त्रिशतक झळकावलं. वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. या दरम्यानच्या कालावधीत कोहली चांगल्या फॉर्मात होता. पण त्याने किती त्रिशतक झळकावली, हे त्याने सांगावे. आतापर्यंत तरी कोहलीला एकदाही त्रिशतक झळकावता आलेले नाही.

By प्रसाद लाड | Published: October 01, 2018 4:00 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून कोहलीचे नाव बऱ्याचदा घेतले गेले. पण भारतीय संघाचे ट्रेनर शंकर बासू यांच्यानुसार करुण हा संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे.

मुंबई : खेळ आणि राजकारण यांची काही तत्त्वं असतात. खेळातही काही वेळा राजकारण येतं, पण त्या राजकारणामुळे कुणाचा नाहक बळी जाऊ नये, एवढी साधी अपेक्षा करायला हरकत नसावी. आतापर्यंत भारतीय संघात बरेच राजकारण झाले. पद्माकर शिवलकर, अमोल मुझुमदार हे त्या राजकारणाचेच बळी. काही खेळाडू गुणवत्ता असूनही भारताकडून खेळले नाहीत आणि काही खेळाडू विशेष गुणवत्ता नसूनही खेळले. करुण नायर हादेखील संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या राजकारणाचा बळी ठरला आहे, असं आता चाहते म्हणू लागले आहेत.

करुण नायरला संघाबाहेर काढलं, याचं कारण काय? या प्रश्नाचे उत्तर निवड समितीने द्यायला हवं. कोहली आणि शास्त्री यांचाही संघ निवडीत सहभाग असतो, त्यामुळे त्यांनीही या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. पण शास्त्री सध्या अकलेचे तारे तोडण्यात मग्न आहेत. भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव हा नाणेफेक गमावल्यामुळे झाला, असा जावईशोध शास्त्री यांनी लावला आहे. उद्या असंच काही कारण ते करुण नायरच्या बाबतीतही देतील. पण या निर्णयामुळे आपण एका गुणवान खेळाडूची कारकीर्द बरबाद करत आहोत, याचं त्यांना सोयरसुतकही नाही.

इंग्लंडविरुद्धच्या 2016च्या कसोटी मालिकेत करुणला पहिल्यांदा संधी देण्यात आली. पहिल्या डावात त्याने चार धावा केल्या. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात करुणने नाबाद त्रिशतक झळकावलं. वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. या दरम्यानच्या कालावधीत कोहली चांगल्या फॉर्मात होता. पण त्याने किती त्रिशतक झळकावली, हे त्याने सांगावे. आतापर्यंत तरी कोहलीला एकदाही त्रिशतक झळकावता आलेले नाही. पण करुणने त्रिशतक झळकावले आणि त्यानंतरच्या सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. करुणने इंग्लंडविरुद्ध नाबाद 303 धावांची खेळी साकारली, पण या खेळीला अखेर केराची टोपलीच दाखवली. ज्या सामन्यात इंग्लंडचा संघ 207 धावांवर सर्वबाद होतो, त्या सामन्यात एकटा करुण त्रिशतक झळकावतो, याचे मूल्यमापन कोहली, शास्त्री, संघ व्यवस्थापन, निवड समिती यांनी करायला हवे होते. पण तसे का झाले नाही, याचे उत्तर मिळत नाही. आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत, असा कोहली आणि शास्त्री यांनी अलिखित नियमच केला आहे. त्यामुळे त्यांना विचारलेल्या प्रश्नांची कधीच समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत.

करुणने त्रिशतक झळकावले त्यानंतर त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले. एखादा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असताना त्याला खेळवायचे की वगळायचे, हा निर्णय अनाकलनीय असाच होता. चांगली खेळी साकारूनही जर तुम्हाला संघाबाहेर राहावे लागत असेल, तर साहजिकच तुमची मानसिकता खचून जाणार. आणि हेच कोहली आणि शास्त्री यांनी केले. त्रिशतकानंतर करुणला दोन सामन्यांसाठी वगळले. त्याचे मानसिक खच्चीकरण केले. त्यानंतर दोन सामन्यांनंतर त्याला संधी दिली आणि त्यानंतर गेले वर्षभर त्याला संघाबरोबर पर्यटक म्हणून ठेवले आहे. 25 मार्च 2017 या दिवशी करुण अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष तो संघाबरोबर आहे. फॉर्मात आहे, तंदुरुस्त आहे. पण तरीही अंतिम अकरा जणांच्या संघात त्याची वर्णी लागत नाही. दीड वर्ष संधी न मिळताही त्याला संघाबाहेर काढले जाते. यामध्ये नेमका विचार काय, याचे उत्तर मिळायला हवे.

खेळाडू हा तंदुरुस्त असायला हवा. भारतीय संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून कोहलीचे नाव बऱ्याचदा घेतले गेले. पण भारतीय संघाचे ट्रेनर शंकर बासू यांच्यानुसार करुण हा संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे.  संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूबरोबर तुम्ही असा व्यवहार करणार असाल, तर अन्य खेळाडूंनी पाहायचे नेमके कुणाकडे, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.

माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनीही या प्रकरणी टीका केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असल्यापासून पाटील करुणला पाहत आले आहेत. त्यामुळे त्याचा खेळ नेमका कसा आहे, हे त्यांना जास्त चांगले माहिती आहे. एखाद्या खेळाडूला न खेळवता तुम्ही त्याला बाहेर कसं काढू शकता, हा सवाल त्यांनीही उपस्थित केला आहे. त्यांच्याबरोबर बऱ्याच माजी खेळाडूंनीही हा सवाल विचारला आहे, या प्रश्नाचे उत्तर निवड समितीने द्यायला हवे. फॉर्म, फिटनेस या दोन्ही गोष्टींमध्ये करुण चपखल बसतो. तरी त्याला संघातून बाहेरचा रस्ता कोणाच्या सांगण्यावरून दाखवण्यात आला, हे निवड समितीने स्पष्ट करायला हवे.

इंग्लंड दौऱ्यात कोहली वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. पण तरीही संघात असलेल्या करुणला संधी देण्यात आली नाही. करुणला संधी दिली आणि तो चांगला खेळला तर पुन्हा एकदा त्याला खेळवावे लागेल, असा विचार संघ व्यवस्थापन करत असेल तर ती लाजिरवाणी गोष्ट असेल. शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल यांना संघातून आत-बाहेर केले. हनुमा विहारीला संधी दिली. त्याला संधी दिली याचे वाईट वाटत नाही, पण त्यावेळी करुणला संधी का दिली नाही, याचे उत्तर मिळत नाही.

 कोहली आणि शास्त्री यांनी संघात आपला एक कंपू तयार केला आहे. त्यांची कामगिरी कशीही झाली तरी त्यांना संघात स्थान मिळते. धवन, राहुल, हार्दिक पंड्या हे खास कोहलीच्या गोटातील आहेत, हे जगजाहीर झालेले आहेच. त्यामुळेच आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सुरैश रैना आणि आता करुण यांची कारकीर्द आता संपण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे.

प्रत्येक कर्णधार आपल्या मतानुसार संघबांधणी करत असतो. धोनीने तसे केले हे मान्य. पण धोनीने कोणत्याही खेळाडूला संधी न देता संघाबाहेर काढलेले नाही. धोनीने संघाची मोट बांधताना काही खेळाडू घडवलेही, कोहलीने किती खेळाडू घडवले, याचे उत्तर मिळत नाही. एखादा खेळाडू दोन डावांमध्ये भोपळाही फोडत नाही, तरी त्याला पुढच्या सामन्यात संधी मिळते आणि त्रिशतक झळकावणारा खेळाडू कायम पर्यटक राहतो, हे भारतीय संघातील विदारक आणि अस्वस्थ करणारे चित्र आहे.

प्रत्येक संघाचे नेतृत्व कुणा ना कुणाकडे असते, पण त्या व्यक्तीने हुकूमशहा होण्याचा प्रयत्न करू नये. सध्याच्या घडीला संघात असेच चालू असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. आपल्याला डीआरएस कधी घ्यायचा ते कळत नाही, दडपणाखाली नेतृत्व करता येत नाही, पण तरीही हम करे सो कायदा, असंच तुम्ही वागत बसलात तर ते संघाचे आणि देशाचे नुकसान आहे. करुणच्या निर्णयाबाबत तर ते दिसून आले आहे. संघातील खेळाडू आणि चाहतेही या गोष्टीला कंटाळले आहेत. त्यामुळे रोहित शर्माने आशिया चषक जिंकल्यावर कोहलीकडून कर्णधारपद काढून घेण्यात यावे, असंही म्हटलं जात आहे. एका स्पर्धेवरून कर्णधारपदाचा निर्णय नक्कीच घेऊ नये, पण हा सारा हुकूमशाहीचा परिपाक आहे, हे समजून घ्यायला हवे.

खेळाडूची निवड गुणवत्ता, तंदुरुस्ती आणि फॉर्म या त्रिसूत्रीच्या जोरावर व्हायला हवी, हा सर्वसाधारण निकष आहे. या निकषाला तर्क आहे. पण जर असे घडत नसेल तर कुठेतरी पाणी मुरत आहे, हे मात्र नक्की. एखाद्या खेळाडूला संधी न देता संघातून बाहेर काढणे, हे दर्दी चाहत्यासाठी नक्कीच क्लेशदायक आहे. आता करुणच्या बाबतीत हे घडले आहे, उद्या आणखी काही अन्य गुणवान खेळाडूंच्या बाबतीतही ही गोष्ट घडू शकते. खेळाडूंचे आयुष्य धुळीस मिळवणारे, उद्या निवृत्त होतीलही, पण त्या खेळाडूवर या गोष्टीचा काय परिणाम होईल, याचा विचार व्हायला हवा. जर एखाद्या खेळाडूने या नैराश्यातून जर स्वत:चे बरे-वाईट करून घेतले जर दोष नेमका कुणाचा, याचे उत्तर देणार कोण? 

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ