चेम्सफोर्ड: इंग्लंडदौऱ्यातील पहिल्या सराव सामन्यात एसेक्सविरुद्ध भारताने पहिल्या दिवशी सहा बाद ३२२ धावा केल्या. दिनेश कार्तिक ८१ तर हार्दिक पंड्या २२ धावांवर खेळत आहेत.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सलामीचा फलंदाज शिखर धवन तिसºयाच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराही एक धाव काढून तंबूत परतला. पाच धावांतच भारताचे दोन महत्वाचे फलंदाज बाद झाले होते.
त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला काही चमक दाखवता आली नाही. अजिंक्य १७ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था १९ षटकांत तीन बाद ४४ धावा अशी झाली होती. मुरली विजय मात्र दुसºया बाजूने चांगली फलंदाजी करत होता. रहाणे व विजय यांनी ३९ धावांची भागिदारी केली.
मुरली विजय व कर्णधार कोहलीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. विजयने ११३ चेंडूत ५३ धावा केल्या. विजय बाद झाल्यानंतर विराट कोहलीही ६८ धावांवर तंबूत परतला. विराटने ९४ चेंडूचा सामना केला. यात त्याने १४ चौकार लगावले.
भारतीय संघ अडचणीत आला असताना दिनेश कार्तिक व लोकेश राहूल यांनी भारताची धावसंख्या २५० च्या पुढे नेली. राहूलने ९२ चेंडूत ५८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने व कार्तिकने कोणतही पडझड होऊ दिली नाही.